केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची भूमिका : बायंगिणीचाच हटवाद का? जनभावनांची कदर करून अन्यत्र न्या
पणजी : कचरा प्रकल्पास आमचा विरोध नाही. मात्र लोकभावनांचा आदर करून तो लोकवस्तीपासून दूर स्थापन करण्यात यावा. जुने गोवे सारख्या जागतिक पर्यटन स्थळाजवळ प्रस्तावित कचरा प्रकल्पाच्या बाबतीत हाच प्रकार दिसून येत असून ती जागा चुकीची आहे. त्यामुळे तेथील लोकवस्तीचा विचार करूनच आपण त्याला विरोध करत आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले आहे. पणजीत भाजप मुख्यालयात आयोजित केंद्रीय राज्यमंत्री जितिन प्रसाद आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासमवेत पत्रकार परिषदेला संबोधित केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बायंगिणीत कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास आपला वैयक्तिक विरोध आहे. त्यासंबंधी यापूर्वीही आपण त्याला विरोध केला होता व सरकारला विरोधामागील कारण आणि एकुणच मुद्दा पटवून देण्याचे प्रयत्न केले होते. त्यामुळे सरकारने सार्वजनिक हितासाठी या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
या प्रकल्पास केवळ श्रीपाद नाईक यांनीच विरोध केला आहे, असे नव्हे तर स्थानिक आमदार राजेश फळदेसाई आणि जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक हेही जोरदार विरोध करत आहेत. त्यावरून होणाऱ्या विरोधाचे गांभीर्य लक्षात येते. अशावेळी आता कचरा व्यवस्थापन मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी त्यासंदर्भात फेरविचार करण्याची वेळ आहे, असे नाईक म्हणाले. यासंबंधी आपण मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मोन्सेरात यांच्याशी चर्चा केली आहे, असे संबंधित प्रश्नावर नाईक यांनी सांगितले व जनभावनांची कदर करून सदर प्रकल्प अन्यत्र उभारण्यात यावा, अशी मागणी केली. दरम्यान, याच जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या जागेत एका बेकायदेशीर बंगल्याचेही बांधकाम करण्यात आले असून त्यावर अद्याप कारवाई का झालेली नाही? असे विचारले असता, सदर विषय न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगून नाईक यांनी उत्तर देण्याचे टाळले.









