मराठा मंदिर येथे प्रदर्शन : बेळगावकर -विद्यार्थ्यांना शिवकालीन शस्त्रप्रदर्शनातून प्रेरणा
बेळगाव : रोटरी क्लब साऊथ आयोजित शिवकालीन शस्त्रप्रदर्शनाची शुक्रवार दि. 14 रोजी सांगता होत आहे. मराठा मंदिर येथे भरलेल्या या प्रदर्शनाने बेळगावकर आणि प्रामुख्याने विद्यार्थ्यांना शिवकालीन शस्त्रप्रदर्शनाची माहिती देऊन प्रेरणाच दिली आहे. क्लबने विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन विनामूल्य ठेवल्याने त्यांची सोय झाली असून गेले चारही दिवस विद्यार्थ्यांच्या गर्दीने मराठा मंदिरचे सभागृह फुलून गेले होते.
शुक्रवारी या प्रदर्शनाची सांगता होत असताना खुद्द छत्रपती शिवाजी महाराज वापरत असलेली पवित्र कवड्यांची माळ या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे म्हणजे छत्रपती शिवरायांचे स्वामीनिष्ठ सुभेदार व स्वराज्याच्या शौर्यात्मक इतिहासातील एक सुवर्ण पान आहेत. अतुलनीय शौर्य, साहस व अस्सिम त्यागाचे प्रतिक असलेल्या या सुभेदाराने आपल्या मुलाच्या विवाहाचा विचार न करता 4 फेब्रुवारी 1670 मध्ये सिंहगड घेताना आपला देह रयतेच्या स्वराज्यासाठी अर्पण केला.
तानाजी मालुसरे यांचे हे अत्युच्च बलिदान पाहून छत्रपती शिवाजी महाराज भारावून गेले होते. त्यांनी आपल्या नित्य वापरातील कवड्यांची माळ सुभेदारांच्या देहावर अर्पण केली होती. तीच कवड्यांची माळ आज या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. शिवाय मालुसरे घराण्याच्या वंशज डॉ. शीतलताई शिवराज मालुसरे यावेळी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 6 वाजता अमर अडके यांचे ‘शिवरायांचा आठवावा प्रताप’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
प्रदर्शन आज रात्री 11 पर्यंत
शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाला लाभलेला वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन सदर प्रदर्शन शुक्रवारी रात्री 11 पर्यंत खुले ठेवण्यात आले आहे. वास्तविक सदर प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 9 असे होते, परंतु खास लोकाग्रहास्तव शुक्रवारी ते रात्री 11 पर्यंत खुले राहणार आहे, असे रोटरी क्लब साउथच्यावतीने कळविण्यात आले आहे.









