खात्याचे दुर्लक्ष : तातडीने सुविधा पुरविण्याची मागणी
बेळगाव : बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणाऱ्या सुविधा ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे बांधकाम कामगारांचे विद्यार्थी अडचणीत आले आहेत. विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच शिष्यवृत्ती आणि इतर सुविधा देण्यात याव्यात, या मागणीसाठी जिल्हा बांधकाम कामगार संघटनेने कामगार खात्याच्या कार्यालयावर आंदोलन केले आहे. शिवाय कामगारांना सुविधा तातडीने पुरवा, अशी मागणी करत कामगार खात्याच्या अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले. बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणारी स्कॉलरशीप, लॅपटॉप आणि विवाहासाठी मिळणारे साहाय्यधन पूर्णपणे थांबले आहे. 2021 म्हणजेच कोरोना काळापासून विद्यार्थ्यांना कामगार कल्याण मंडळाकडून मिळणाऱ्या सुविधा ठप्प झाल्या आहेत.
शिवाय कामगारांचा अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर मिळणारी रक्कम देखील वारसांना अद्याप मिळालेली नाही. कामगारांच्या महिलांना प्रसूतीनंतर मिळणारी रक्कम, कामगारांच्या आरोग्य आणि उपचारासाठी मिळणारी रक्कम अद्याप मिळालेली नाही. कामगारांच्या हक्काची रक्कम मिळण्याऐवजी त्यांना या सुविधांपासून वंचित ठेवण्यात आल्याची तक्रारही कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. कामगारांना शासकीय सुविधांबरोबर त्यांना मिळणाऱ्या सवलती तातडीने देण्यात याव्यात अन्यथा कार्यालयावर मोठा मोर्चा काढू, असा इशाराही देण्यात आला आहे. कामगार जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अॅड. एन. आर. लातूर, राहुल पाटील व कामगार उपस्थित होते.









