कराड :
‘नशामुक्त कराड’साठी प्रयत्न करणाऱ्या कराड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने नशेची धुंदी वाढवण्यासाठी बेकायदा तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळायला सुरूवात केली आहे. एमडी (मेफेड्रॉन)ची कराड शहरात तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र या रॅकेटचा पूर्णत: उलगडा करण्यासाठी पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास सुरू केला असून तपासातील एकही माहिती बाहेर पडता कामा नये, अशी व्युहरचना रचली आहे.
सांगली येथे ड्रग्जची मोठी कारवाई झाल्यानंतर शेजारच्या कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्याच्या पोलिसांनीही छापासत्र सुरू केले. कराडला यापूर्वी गांजा विक्रीच्या कारवाया झाल्या असल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख, डॉ. वैशाली कडूकर यांनी जिल्ह्यासह कराडलाही गोपनीय पद्धतीने तपासणीच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अशोक भापकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी वेगाने कार्यरत झाले. त्यांनी आपले कौशल्य पणाला लावत कराड शहरासह मलकापूर, ओगलेवाडी परिसरात सापळा रचला. या दरम्यान अमोल ठाकूर यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, छापे टाकले असता ओगलेवाडी येथून ड्रग्ज हस्तगत करण्यात आले. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याने उपअधीक्षक ठाकूर यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने तपासाला सुरूवात केली. बुधवारीही दिवसभर पोलीस तपास कामात व्यस्त होते. यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात येत नव्हती. पोलीस तपासाला अडथळा येऊ नये, या दृष्टीने गोपनीय पद्धतीने तपास सुरू होता.








