चिपळूण :
गेल्या महिन्यात टेरव येथील जंगलातील कोळसा भट्ट्या उद्ध्वस्त करत कोळसा व्यापाराचा पुरता बिमोड केल्यानंतर वनविभागाने मंगळवारी रात्री कळवंडे-माडवाडी येथील डोंगरात लावण्यात आलेल्या तब्बल १२ कोळसा भट्टयांवर कारवाई करत त्या उद्ध्वस्त केल्या. परिपूर्ण असलेल्या आठ भट्टया पेटवून दिल्या तर चार भट्ट्यांसाठी रचलेले लाकूड जप्त केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कोळसा भट्ट्यांसाठी टेरव गाव प्रकाशझोतात आहे. दरवर्षी पावसाळ्यानंतर या जंगलात कोळसा भट्ट्या लावल्या जातात. गावातील काही जागरुक नागरिकांनी या विरोधात आवाज उठवला की, मग त्यावर कारवाई करून त्या उद्ध्वस्त केल्या जातात. गेल्या दोन महिन्यात टेरव येथील जंगलात तीनवेळा कारवाई करून भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. व्यावसायिकांवर गुन्हेही दाखल केले. सद्यस्थितीत टेरव येथील भटट्या थंडावलेल्या असतानाच आता नव्याने कळवंडे गावात भट्ट्या लावल्या जात असल्याचे मंगळवारी रात्री करण्यात आलेल्या वनविभागाच्या कारवाईवरुन स्पष्ट झाले आहे.








