कोल्हापूर :
मनपाला रस्त्यातील खड्डे बुजवायला पावसाळ्यापूर्वी दरवर्षी एप्रिल–मे महिन्यात मूहूर्त मिळत नाही. यंदाही तीच स्थिती आहे. उन्हाळ्यात निवांत असणारी यंत्रणा रिपरिप पावसात कधी माती मिश्रीत मुरूम तर पावसाची उघडीप असताना डांबरविरहीत खडी टाकून चालुगिरी करत असल्याचे दरवर्षीचे चित्र आहे. मुदतीत खराब रस्ते करुन घेण्यासह इतर खड्डे बुजवण्याचा योग्य कालावधी असतानाही याकडे कानाडोळा केला जात आहे. यापूर्वी केलेल्या खड्डे बुजवण्याच्या कामात डांबराचा पत्ताच नसल्याने खडी इतरत्र विस्कटून वाहनधारक घसरुन पडत आहेत.
महापालिका दरवर्षी साधारण तीन कोटी रुपये रस्त्यातील खड्डे बुजवण्यासाठी खर्च करते. पावसाळ्यापूर्वी एप्रिल–मे महिन्यात खराब रस्त्यांचा आढावा घेवून डागडूजी केली जात असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात पहिल्याच पावसाच रस्ते वाहून जातात मगच यंत्रणेला जाग येते. मागील काही वर्षापासून मुसळधार पावसाचे कारण सांगून यंत्रणा खराब रस्त्याबाबत ठेकेदारांना पाठीशी घालत आहे. महापालिका प्रशासकांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतरच मनपाच्या सार्वजानिक बांधकाम विभागाला जाग येते.
प्रशासक कारवाई करतील याभितीने मनपाची यंत्रणा खड्डे शोधण्याची मोहीम हाती घेते. जूजबी कारण सांगत ठेकेदारांना वाचवण्यासाठी धडपड सुरू होते. एखाद दुस्रया ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्यालिकडे कारवाई पुढे जात नाही. वास्तविक रस्ते बांधणी करतानाच ते काम दर्जेदार व्हावे यासाठी मनपा यंत्रणा प्रयत्न करत नसल्यानेच कोल्हापूरची ओळख खड्डेपूर झाली आहे. मागील काही महिन्यात बुजवलेल्या खड्ड्यात डांबराचे प्रमाण अत्यल्प वापरुन ठेकेदाराची भर केली जात आहे. डांबर प्रमाण कमी अन रोलींग केले नसल्याने खड्ड्यातील खडी रस्त्यावर आजूबाजूला पसरत आहे. याखडीवरुन मोठ्या प्रमाणात दुचाकी घसरत आहेत.
- धुळीमुळे नेत्रपटलाची हानी
रस्त्यांतील खड्डे आणि चुकीच्या पध्दतीने केलेल्या बांधणीमुळे धुळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दिवसेंदिवस नेत्ररुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. वाहनावरुन जात असताना धुलीकण वेगाने डोळ्यात गेल्याने अपघात संभवतो. डोळ्यात गेलेला धुलीकण काढण्याकरीता आपण तो डोळा हाताने चोळतो. यामुळे देखील नेत्रपटलाला जखम होण्याचा संभव असतो. धुळीकणांमुळे डोळ्यांचे विकार वाढत आहेत.
- अस्थमाच्या रुग्णांमध्ये वाढ
खराब रस्त्यांमुळे वाढत्या धुलीकणामुळे श्वसनास त्रास होत आहे. श्वसन विकारामध्ये खोकला, कफ पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत घरघर करणे, फुप्फुस कमकुवत होणे आदींचा त्रास नागरिकांना होत आहे. शहरांमधील वातावरणातील प्रदुषणाला कारणीभूत सल्फेट नायट्रेटस, कार्बन मोनोऑक्साईड, ब्लॅक कार्बन, धुळीचे कण व 2.5 मायक्रॉनचे पार्टिकल कण श्वसननलिकेमध्ये श्वासाद्वारे शिरतात. त्यामुळे श्वसननलिका लालसर होते, आकुंचन पावण्याचा धोका असतो.








