पणजी : प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी दुसरी रेल्वे आज गुऊवारी 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.40 वाजता मडगाव रेल्वे स्थानकावरून सुटणार असून त्यानंतर 21 फेब्रुवारीला तिसरी रेल्वे जाणार असल्याची माहिती समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. मंत्रालयात पर्वरी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, या मोफत रेल्वेसेवेचा लाभ वय वर्ष 18 ते 60 या वयोगटातील लोकांनाच मिळणार आहे. या वयोगटाच्या बाहेरील लोकांनी रेल्वेत प्रवेश केल्यास त्यांना दंड ठोठावून जवळच्या रेल्वे स्थानकावर उतरण्यात येणार आहे. रेल्वे प्रवासासाठी समाजकल्याण खात्यातर्फे ओळखपत्रे देण्यात येणार असून ते नसलेल्यांना रेल्वेत प्रवेश मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रयागराजला जाणाऱ्या दुसऱ्या रेल्वेत 1300 प्रवाशांना संधी मिळणार असून ती आज गुऊवारी सायंकाळी रवाना होणार आहे. ती 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.30 वा. प्रयागराज येथे पोहोचणार आहे. तर 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत ती पुन्हा मडगाव रेल्वे स्थानकावर परतणार आहे. प्रवाशांची नावे इतर माहिती असणारी ओळखपत्रे खात्यातर्फे देण्यात येतील, असेही ते म्हणाले. प्रयागराज ते संगम घाटाचे अंतर येथून 30 कि.मी आहे. तेथे जाण्यासाठी चालण्याची तयारी असावी. तेथून पुढील खर्च भाविकांनी करायचा असून त्यांची सुरक्षा, सामान आरोग्याची जबाबदारी सरकारची नसेल, याची नोंद संबंधितांनी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.









