कोल्हापूर :
बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या कळंबा (ता. करवीर) येथील एका खासगी हॉस्पिटलवर जिल्हा शल्यचिकीत्सक, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने बुधवारी छापा टाकला. या रुग्णालयातून गर्भपाताच्या औषधाचा साठा जप्त केला. या प्रकरणी रुग्णालयाच्या महिला डॉक्टर दिपाली सुभाष ताईगडे (वय 46, रा. साई मंदिरसमोर, कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर) हिला ताब्यात घेतले. याचदरम्यान या पथकाने वरणगे पाडली (ता. करवीर) येथे गर्भपाताचे औषधे घरपोहच करणाऱ्या सुप्रिया संतोष माने (वय 42, रा. रायगड कॉलनी, कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर), धनश्री अरुण भोसले (वय 30, रा. शिंगणापूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर) या दोन महिलांना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. या प्रकाराने कोल्हापुरात पुन्हा एकदा गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याचे या घटनेने उघड झाले. याप्रकरणी रात्री उशिरा करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.
याबाबत अधिक माहिती अशी, संशयित दिपाली ताईगडे बीएचएमएस पदवीधर डॉक्टर आहेत. गेल्या काही महिन्यापासून त्यांनी आपले रुग्णालय कळंबा (ता. करवीर) येथील श्री साई मंदिरासमोर उभा केलेल्या इमारतीमध्ये श्रध्दा नावाने रुग्णालय सुरु केले होते. डॉ. ताईगडे या बीएचएमएस असूनही, त्या आपल्या रुग्णालयात बेकायदेशिरपणे गर्भलिंग निदान आणि गर्भपात करीत, असल्याबाबतच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आरोग्य विभागाकडे दाखल झाल्या होत्या. त्यानुसार या रुग्णालयावर छापा टाकण्यापूर्वी जिल्हा शल्य चिकीत्स्क, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने बोगस गर्भवती महिलेला गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्यासाठी या रुग्णालयात पाठविले. या रुग्ण महिलेला डॉ. ताईगडे यांनी गर्भपाताची औषधे देवून, गभलिंग निदान करणाऱ्या तरुणाला सोनोग्राफी मशिन घेवून येण्यास सांगतिले. याचवेळी त्या संबंधीत तरुणाला या कारवाईची कुणकुण लागली. तो या रुग्णालयाकडे फिरकलाच नाही. त्याचा या पथकाने बराच वेळ वाट पाहिली. तो येणार नसल्याची खात्री बोगस महिला रुग्णाने रुग्णालयातून रुग्णालयाबाहेर थांबलेला इशारा करुन दिली. त्यानंतर या पथकाने या रुग्णालयावर छापा टाकला. या छाप्यावेळी डॉ. ताईगडे यांना बोगस गरोदर महिलेला गर्भपाताची औषधे देताना रंगेहाथ पकडले. तसेच त्यांच्या रुग्णालयातून गर्भपाताचा औषधाचा साठा जप्त केला.

दरम्यान या पथकाला वरणगे पाडळी (ता. करवीर) येथे दोन महिला घरपोहच गर्भपाताच्या औषधाचा पुरवठा करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन या पथकाने तत्काळ वरगणे पाडळीकडे आपला मोर्चा वळविला. पथकातील अधिकाऱ्यांनी या दोन महिलांना पकडण्यासाठी गर्भपाताची औषधे हवा असल्याबाबत बनाव केला. ही औषधे याच गावातील शासनाच्या आरोग्य विभागात काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यास घरी घेवून येण्यास सांगतिले. त्यावरुन सुप्रिया माने, धनश्री भोसले औषधे घेवून आल्या. या दोघींनी या औषधाचे तीन हजार रुपये स्विकाऊन गर्भपाताची औषधे देत असताना या दोघींना या पथकाने रंगेहाथ पकडले. सर्व संशयितान गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसानी दिली. या कारवाईत जिल्हा शल्यचिकीत्स्क डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी तथा करवीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने, खुपिरे ग्रामीण ऊग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. सुनिल भिकाजी देशमुख, कनिष्ट सहाय्यक मोहन पाटील, करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल टकले आदीच्या पथकात सहभाग होता.
- मोठी टोळी कार्यरत ?
या प्रकारामागे मोठी टोळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रुग्णांचा शोध, रुग्णांची गभलिंग तपासणी करणे आणि आवश्यकता वाटल्यास गर्भपात करणे. यासाठी मोठे कमिशन देऊन लोकांना सहभागी करून घेतले जात असावे, या शक्यतेसह ही टोळी महाराष्ट्र–कर्नाटक सीमाभागात विस्तारलेली असावी, दुष्टीने पोलिसांनी तपास करणे आवश्यक आहे.








