सामनावीर निझार व अझहरची भागीदारी ठरली निर्णायक, जेकेचे प्रयत्न अपुरे
वृत्तसंस्था/ पुणे
केरळने हुशारीने फलंदाजी करीत जम्मू काश्मिरविरुद्धचा रणजी करंडक उपांत्यपूर्व सामना अनिर्णीत राखत पहिल्या डावातील केवळ एका धावेने मिळविलेल्या आघाडीवर उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.
सामनावीरचा मानकरी ठरलेला सलमान निझार (162 चेंडूत नाबाद 44) व मोहम्मद अझहरुद्दिन (118 चेंडूत नाबाद 67) यांनी तब्बल 43 षटके खेळून काढत सामना अनिर्णीत राखत एकप्रकारे जम्मू काश्मिरवर नैतिक विजय मिळविला. या दोघांनी सातव्या गड्यासाठी नाबाद 115 धावांची भागीदारी केली. 399 धावांचे आव्हान मिळाल्यानंतर आदल्या दिवशी केरळने 2 बाद 100 धावा जमविल्या होत्या. पण निझार व अझहरुद्दिन यांनी शेवटच्या दिवशी केलेली अभेद्य भागीदारी त्यांना उपांत्य फेरी गाठून देण्यास पुरेशी ठरली. केरळने 126 षटकांत 6 बाद 295 धावा जमविल्या. 17 फेब्रुवारीपासून त्यांची उपांत्य लढत माजी चॅम्पियन गुजरातविरुद्ध होणार आहे.
यापूर्वी केरळने 2018-2019 मोसमात रणजी करंडक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. यावेळी त्यांना दुसऱ्यांदा हा टप्पा गाठला आहे. 2018-19 या मोसमात त्यांना उपांत्य फेरीत विदर्भकडून एक डाव 11 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता आणि विदर्भने त्यावेळी रणजी करंडकही पटकावला होता.
‘आम्ही स्वत:वर विश्वास ठेवला आणि भागीदारी रचली. जेके गोलंदाजांनीही अप्रतिम मारा करीत आमचे काम कठीण केले होते. हाच अॅप्रोच आम्ही पहिल्या डावातही ठेवला होता,’ असे निझार पुरस्कार स्वीकारल्यानंतर म्हणाला. केरळच्या पहिल्या डावातही त्याने महत्त्वाची खेळी करीत नाबाद 112 धावा करतपाना बसिल थम्पीसमवेत 81 धावांची भागीदारी करून आपल्या संघाला केवळ एका धावेची आघाडी मिळवून दिली होती.
‘आम्ही कठोर प्रयत्न केले, पण दुर्दैवाने आमच्या मनासारखा निकाल लागू शकला नाही. याचे श्रेय केरळच्या फलंदाजांनाही द्यायला हवे. पण शेवटपर्यंत आम्ही झुंज दिली याचा आम्हाला अभिमान वाटतो. भविष्यात याहून सरस कामगिरी करण्याचा आम्ही प्रयत्न करून यश मिळवू,’ अशी आशा जेके संघाचा कर्णधार पारस डोग्राने व्यक्त केली. जेकेचा डावखुरा स्पिनर अबिद मुश्ताक याला फेकी गोलंदाजी केल्याबद्दल तत्काळ ताकीद दिली आणि त्याने टाकलेला चेंडू नोबॉल ठरविला. केरळचा कर्णधार सचिन बेबी (48) व अक्षय चंद्रन (48) यांनीही मोलाचे योगदान देत तिसऱ्या गड्यासाठी 58 धावांची भागीदारी केली. विशेष म्हणजे या भागीदारीसाठी जवळपास 44 षटके फलंदाजी करीत जेकेच्या गोलंदाजांना निष्प्रभ केले.
संक्षिप्त धावफलक : जम्मू काश्मिर 280 व 9 बाद 399 डाव घोषित, केरळ 281 व 126 षटकांत 6 बाद 295 (सलमान निझार नाबाद 44, मोहम्मद अझहरुद्दिन नाबाद 67, सचिन बेबी व अक्षय चंद्रन प्रत्येकी 48, साहिला लोत्रा 2-50)









