गाझाच्या 2 हजार आजारी मुलांना सांभाळणार : ट्रम्प यांच्याकडून मदत रोखण्याची धमकी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांनी गाझामधील 2 हजार आजारी मुलांना देशात राहू देण्याची तयारी दर्शविली आहे. व्हाइट हाउसच्या ओव्हल ऑफिसमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या चर्चेत त्यांनी यासंबंधी घोषणा केली. यातील अनेक मुले कॅन्सरने पीडित आहेत किंवा गंभीर स्थितीत आहेत, त्यांना लवकरात लवकर जॉर्डनमध्ये आणले जाईल असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. तर या निर्णयावर ट्रम्प यांनी आनंद व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे अब्दुल्ला यांनी पॅलेस्टिनींना सरसकट स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
ट्रम्प हे गाझामधून पॅलेस्टिनींना विस्थापित करत इजिप्त आणि जॉर्डनमध्ये स्थायिक करू इच्छित आहेत. या योजनेला नकार दिल्यास इजिप्त अन् जॉर्डनला मिळणारी अमेरिकेची मदत रोखण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. तर किंग अब्दुल्ला यांनी एक्सवर पोस्ट करत पॅलेस्टिनींना जॉर्डनमध्ये वसविण्यास विरोध दर्शविला आहे.
गाझामध्ये रिसॉर्ट सिटी
डोनाल्ड ट्रम्प हे गाझामधून पॅलेस्टिनींना विस्थापित करत त्यावर अमेरिकेचे नियंत्रण इच्छितात. ट्रम्प गाझामध्ये रिसॉर्ट सिटी निर्माण करु पाहत आहेत. ट्रम्प यांनी अमेरिका गाझाचा विकास करेल आणि तेथे आकर्षक घरं उभारणार असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट करत 6 फेब्रुवारी रोजी म्हटले होते. पॅलेस्टिनींना गाझामध्ये वसविण्याऐवजी अन्य नव्या ठिकाणी वसविणे चांगले ठरेल असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. ट्रम्प यांच्या या योजनेला इस्रायलचे समर्थन मिळाले आहे. इस्रायलचे संरक्षणमतंत्री काट्ज यांनी सैन्याला याच्याशी निगडित योजना तयार करण्याचे आदेश देखील दिले आहेत. गाझा स्वत:हून सोडू पाहणाऱ्या पॅलेस्टिनीला इस्रायलचे सैन्य मदत करणार आहे.
हमासने नाकारली योजना
इस्रायलच्या विरोधात युद्धात सामील हमासने ट्रम्प यांच्या योजनेला नाकारले आहे. आमच्या लोकांनी भूमी न त्यागा 15 महिन्यांपर्यंत विनाश सहन केला, आम्ही कुठल्याही प्रकारच्या प्रस्तावाला स्वीकार करणार नसल्याचे हमासने म्हटले आहे. गाझामध्ये 15 महिन्यापर्यंत चाललेल्या इस्रायल अणि हमास यांच्यातील लढाईमुळे 23 लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले. तर सुमारे 70 टक्के इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या इमारती पुन्हा उभ्या करण्यासाठी अनेक दशकांचा कालावधी लागू शकतो.
जॉर्डनमध्ये यापूर्वीच 20 लाख पॅलेस्टिनी
संयुक्त राष्ट्रसंघानुसार जॉर्डनमध्ये 20 लाखाहून अधिक पॅलेस्टिनी शरणार्थी राहत आहेत. यातील बहुतांश जणांना जॉर्डनचे स्थायी नागरिकत्व देण्यात आले आहे. तर 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलसोबत युद्ध सुरू झाल्यापासून हजारो पॅलेस्टिनींनी इजिप्तमध्ये आश्रय घेतला आहे. परंतु तेथे त्यांना शरणार्थी म्हणून मान्यता देण्यात आलेली नाही. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बिडेन यांच्या काळात तत्कालीन विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी गाझामधून पॅलेस्टिनींना बळाच्या जोरावर विस्थापित करण्यास विरोध दर्शविला होता. पॅलेस्टिनींवर गाझा सोडण्यासाठी दबाव टाकू नये असे त्यांनी म्हटले होते.









