वाहने जाग्यावर, कचऱ्याचा प्रश्न गंभीर, लाखो रुपये खर्च
बेळगाव : ग्रामीण भागातील कचरा संकलनासाठी राबविण्यात आलेली स्वच्छ भारत मिशन योजना रखडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मोठ्या ग्राम पंचायतीमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी लाखो रुपये खर्चून कचरा वाहू वाहनेही उपलब्ध करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात ही वाहने देखील जाग्यावर थांबलेली दिसून येत आहेत. ग्रामीण भागातील कचऱ्याची शास्त्राsक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्ची घालण्यात आले आहेत. विशेषत: घरातील सुका आणि ओला कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी कचरावाहू वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र विविध कारणांनी ही वाहने ग्राम पंचायतीसमोर वापराविना थांबून आहेत.
राज्यात 5845 ग्राम पंचायतींना या कचरावाहू वाहनांचे वितरण करण्यात आले आहे. या वाहनाद्वारे गावातील कचरा संकलन करणे आवश्यक आहे. मात्र वाहनावर चालकाचा अभाव आणि इतर कारणामुळे ही योजना थबकली आहे. या वाहनांबरोबर महिला स्वसहाय्य गटातील महिलेला चालक म्हणून नेमण्यात येणार होते. मात्र काही ठिकाणी महिलांकडून निरूत्साह दाखविला जात आहे. त्यामुळे चालकाविना ही कचरा वाहने जाग्यावर थांबून आहेत. या कचरा संकलनासाठी प्रत्येक घरातून मासिक 25 ते 30 रुपये वर्गणी देणे आवश्यक आहे. मात्र ग्रामस्थांकडून ही वर्गणी देण्याकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. संकलन केलेल्या कचऱ्यासाठी प्रत्येक ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात व्यवस्थापन प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी 5 ते 10 एकर क्षेत्र निश्चित केले जाणार होते. मात्र हा प्रकल्पही उभा करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
गोलमाल झाल्याचा आरोप
जिल्ह्यातील काही गावांमध्ये कचरा संकलनासाठी घरोघरी दोन बादल्या देण्यात आल्या आहेत. मात्र काही गावांमध्ये बादल्या दिलेल्या नाहीत. त्यामुळे बादल्या वाटपामध्ये गोलमाल झाल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. तर काही गावांमध्ये रंगीत आकाराच्या वाटप झालेल्या बादल्या इतर कामांसाठी वापरल्या जात आहेत.
दोन बादल्यांचे वाटप
सुका आणि ओला कचरा स्वतंत्रपणे वाहनात टाकण्यासाठी घरोघरी दोन बादल्यांचे वाटप करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना घरोघरी जाऊन दररोज कचरा उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी कचरा विल्हेवाट लावण्याचे कामही सुरू आहे.
– रवी बंगरपण्णावर,जि. पं. योजना अधिकारी









