दुसऱ्या दिवशीही आंदोलनावर ठाम : 65 हून अधिक तलाठी आंदोलनात सहभागी
बेळगाव : तलाठी संघाच्यावतीने सोमवारपासून बेमुदत आंदोलन केले जात आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशीही बेळगाव तहसीलदार कार्यालयासमोर दिवसभर आंदोलन करण्यात आले. बेळगाव जिल्हा सरकारी नोकर संघाच्यावतीने तलाठ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. संघाचे अध्यक्ष बसवराज रायवगोळ यांनी उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दिला. कामाचा बोजा कमी करण्यासोबतच वेतनवाढ, मोबाईल, लॅपटॉप देण्याच्या मागणीसाठी कर्नाटक राज्य ग्राम प्रशासकीय अधिकारी मध्यवर्ती संघाच्यावतीने प्रत्येक तहसीलदार कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात येत आहे. मंगळवारी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही काम बंद करत बेळगाव शहर व तालुक्यातील 65 हून अधिक तलाठी आंदोलनात सहभागी झाले होते. जोवर मागण्या मान्य होणार नाहीत, तोवर आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा देण्यात आला. बेळगाव जिल्हा नोकर संघामध्ये तलाठ्यांचाही समावेश होतो. त्यांच्यावरील कामाचा बोजा पाहता त्यांनी केलेल्या मागण्या रास्त आहेत. त्यामुळे या आंदोलनाला नोकर संघाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगुले यांच्यासह नोकर संघाचे पदाधिकारी व तलाठी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
तलाठ्यांनी अॅप्लिकेशन्स केले अनइन्स्टॉल
तलाठ्यांवर जन्म-मृत्यू दाखल्यापासून महसुलासंदर्भातील कामापर्यंत सर्व जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल 16 अॅप्लिकेशन्सचा तलाठ्यांना वापर करावा लागतो तो देखील स्वत:च्या खासगी मोबाईलमधून. त्यामुळे संतप्त तलाठ्यांनी मंगळवारी आपल्या मोबाईलमधून ही 16 अॅप्लिकेशन्स अनइन्स्टॉल केली. सध्या तलाठी कामावर नसल्याने महसूल तसेच जन्म-मृत्यू जात प्रमाणपत्र यांची सर्व कामे रखडली आहेत.









