सरकारला प्रस्ताव सादर, 29.57 लाख जनावरे
बेळगाव : जिल्ह्यात जनावरांची संख्या वाढत असून, नवी 20 पशु चिकित्सालय सुरू करण्यासाठी पशुपालन-पशु वैद्यकीय सेवा खात्याने सरकारला प्रस्ताव पाठविला आहे. जिल्ह्यात सध्या व्हेटर्नरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह एकूण 271 पशु चिकित्सा केंद्रे आहेत. 5,49,540 गायी, 8,44,171 म्हशी, 7,57,679 मेंढ्या, 7,01,741 शेळ्या, श्वान, ससे, डुक्कर यासह एकूण प्राणी आणि जनावरांची संख्या 29,57,228 आहे. याशिवाय कोंबड्यांची संख्या 26 लाख आहे. जनावरांची संख्या वाढत असल्यामुळे पशु चिकित्सालय केंद्रांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.
5 हजाराहून अधिक जनावरे असणाऱ्या भागात व 8 किलोमीटर अंतरावर 1 याप्रमाणे नवे पशु चिकित्सालय स्थापन करण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यातील 48 गावांच्या हद्दीत नवे 20 पशु चिकित्सालय सुरू करणे आवश्यक आहे. पशु चिकित्सा सेवा विभागाने सरकारला पाठविलेल्या प्रस्तावाला अनुमोदन मिळाल्यास दुग्ध व्यवसायाला गती मिळणार आहे. तसेच जनावरांना उपचारासाठी शेतकऱ्यांना दूरच्या अंतरावर पायपीट करीत जाणे टळणार आहे.
वाढत्या जनावरांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पशु चिकित्सा सेवा विभागाने यापूर्वीही सरकारला प्रस्ताव सादर केला होता. त्यावेळी 7 पशु चिकित्सालयांसाठी मंजुरी मिळाली होती. लाळ्या खुरकत सारख्या आजारांमुळे जनावरे वेळीच उपचारअभावी दगावू शकतात. त्यामुळे नजीकच्या अंतरावर पशु चिकित्सालयाची सोय असावी अशी शेतकरी वर्गांची मागणी आहे. रामदुर्ग तालुक्यातील कलहाळ, बन्नूर तांडा, सैंदत्ती-यडहळ्ळी हिरेबुदनूर. बैलहोंगल-केंगानूर, बुडरकट्टी, होळेनागलापूर. चिकोडी-हिरेकोडी, कोथळी, जागनूर, पट्टणकुडी, अथणी-झुंजरवाड, शेगुणशी, अरळीकट्टी, कोट्टलगी, महेशवाडगी, मसरगुप्पी व अडहळ्ळी, कागवाड-मुळवाड व केंपवाड. या गावात पशु चिकित्सालयांची आवश्यकता आहे.









