यात्रेला पहाटे अभिषेक कार्यक्रमाने सुरुवात : बैलगाड्यांची आकर्षक सजावट करून मिरवणूक
वार्ताहर/हिंडलगा
येथील जागृत श्री मष्णाई देवीच्या यात्रेला पहाटे अभिषेक कर्याक्रमाने सुरुवात झाली. यावेळी हिंडलगा ग्राम देवस्थान सुधारणा कमिटीचे अध्यक्ष अनिल पावशे, उपाध्यक्ष मल्लाप्पा चौगुले व सर्व सभासद आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी देवीचे पुजारी हणमंत सुणगार यांनी विधिवत पूजा केली. पूर्वांपार चालत आलेल्या पद्धतीनुसार पूजा झाल्यानंतर सर्व भाविकांचे देवस्की पंच सदस्य गजानन काकतकर व संदीप मोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अभिषेक कार्यक्रमात देवस्की पंच विनोद नाईक, संजय काकतकर, चंद्रकांत अगसगेकर, गुंडू मेणसे, दुर्गापा देवरमनी, सुधाकर शिंदे, विलास हित्तलमनी, मल्लाप्पा सरप, धमेंद्र खातेदार, मनोहर नाईक, दिनेश मास्ते, बाबू मास्ते, व्यंकटेश देवगेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. अनिल पावशे यांनी हस्ते श्रीफळ वाढविले.
यानंतर लक्ष्मी गल्लीतील महालक्ष्मी मंदिरसमोर भाविक व आजी-माजी देवस्की पंचांच्या उपस्थितीत सजविलेल्या बैलगाड्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी जुंपलेल्या बैलांना आकर्षकपणे सजविले होते. माजी देवस्की पंच कमिटीतील अध्यक्ष व ग्रामपंचायतीचे माजी चेअरमन ए. एल. काकतकर, पंच सदस्य नारायण मेणसे, टी. एस. नाईक, रमेश कुडचीकर, परशराम जी. अगसगेकर, निसार पटेल यांचा नूतन हिंडलगा ग्राम देवस्थान सुधारणा कमिटीतर्फे शाल, श्रीफळ, पानवीडा, पुष्प देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी परशराम अगसगेकर, ए. एल. काकतकर यांनी नूतन कमिटीला शुभेच्छा दिल्या. बैलगाड्याची लक्ष्मी गल्ली, रामदेव गल्ली, महादेव गल्ली, विठ्ठल मंदिर रोड, हायस्कूल रस्ता, नवीन वसाहत, मांजरेकरनगर अशा विविध भागातून सवाद्य मिरवणूक काढली. ठिकठिकाणी बैलगाड्यांची सुवासिनी महिलांनी आरती ओवाळून, श्रीफळ वाढवून पूजा केली.
ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छता मोहीम चोख
गावात विविध ठिकाणी स्वागत कमाणी उभारल्या असून विविध संघटनांचे लोकप्रतिनिधींचे स्वागताचे फलक शोभून दिसत आहेत. गावातील महालक्ष्मी मंदिर, मरगाई मंदिर, मारुती मंदिर, विठ्ठल मंदिर, राम मंदिर, कलमेश्वर मंदिर, मष्णाई मंदिर, रेणुका मंदिर या ठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढून विद्युत रोषणाई केली आहे. ग्रामपंचायतीने देखील यात्रेसाठी संपूर्ण गावभर स्वच्छतेवर भर दिला आहे.
मंदिर परिसरात पशु हत्येस बंदी
देवस्की पंच कमिटीने मंदिरासमोर खास सूचना फलक लावला असून गावात देखील जागृती केली आहे. मंदिर परिसरात पशु हत्येस बंदी घातली असून, वडगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यात्रेवर नियंत्रण ठेवून आहेत. देवस्की पंच कमिटी व ग्रामपंचायतमार्फत यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न केला जात आहेत. मंदिर परिसरात हार, नारळ, पूजा साहित्य तसेच खेळणी, पाळणा, मिठाई, आईस्क्रीम यांची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहेत.
विशेषांकाचे थाटात प्रकाशन
येथील श्री मष्णाईदेवी यात्रेनिमित्त ‘तरुण भारत’ मार्फत काढण्यात आलेल्या यात्रोत्सव विशेषांकाचे प्रकाशन गावच्या मध्यवर्ती श्री महालक्ष्मी मंदिरसमोर करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवस्थान समितीचे अध्यक्ष अनिल पावशे होते. विशेषांकाच्या प्रकाशनावेळी ईस्माइल क्लिनिकचे डॉ. ईस्माइल अंबी, डॉ. इम्रान अंबी उपस्थित होते. प्रकाशन समारंभास देवस्की पंच, आजी-माजी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.
माजी देवस्की पंच अध्यक्ष ए. एल. काकतकर यांच्या हस्ते लक्ष्मीमूर्ती पूजन केले. यानंतर पुरवणी संकलक प्रकाश बेळगुंदकर यांनी उपस्थितांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले. तसेच पुरवणी काढण्यासाठी प्रोत्साहन दिलेले देवस्की पंच व युवा कार्यकर्ते गजानन ए. काकतकर, संदीप मोरे, डॉ. ईस्माइल अंबी व डॉ. इम्रान अंबी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. माजी चेअरमन ए. एल. काकतकर यांचा शाल, पुष्पगुच्छ देवून डॉ. ईस्माइल अंबी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. ईस्माइल अंबी, डॉ. इम्रान अंबी विशेषांकाचे कौतुक करून म्हणाले की, गेली 60 वर्षे आम्ही यात्रा पाहतो, परंतु यावेळी यात्रा विशेषांक काढून समस्त गावाला यात्रेविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला हे खरोखरच अभिनंदनीय आहे. या विभागाचे वार्ताहर, पुरवणी संकलक प्रकाश बेळगुंदकर यांचा सर्व ग्रामस्थ, देवस्की पंच, ग्राम देवस्थान सुधारणा कमिटीतर्फे शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ, पानवीडा देवून सत्कार केला. शेवटी अध्यक्षीय मनोगतात अनिल पावशे यांनी यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. आभार गजानन काकतकर यांनी मानले. यानंतर विशेषांकाचे वाटप करण्यात आले.









