रेडा-पालवा सोडण्याचा धार्मिक कार्यक्रम उत्साहात : यात्रेत सात गावांचा समावेश : नागरिकांची उत्सुकता शिगेला
वार्ताहर/अगसगे
हंदिगनूर येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा तब्बल 58 वर्षानंतर 14 एप्रिल 2026 रोजी होणार आहे त्यानिमित्त आज मंगळवार दि. 11 रोजी रेडा व पालवा सोडण्याचा धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाला. हंदिगनूर लक्ष्मी यात्रेच्या कार्यक्षेत्रातील एकूण सात गावची यात्रा यावेळी भरणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ आतापासूनच यात्रेच्या तयारीला लागले लागले आहेत. हंदिगनूर, म्हाळेनहट्टी, बोडकेनहट्टी, कुरिहाळ खुर्द, कुरिहाळ बुद्रुक, कट्टनभावी, होसोळी या गावांचा यात्रेमध्ये समावेश आहे. मंगळवार दि. 11 रोजी सकाळी सात वाजता गावातील सर्व मंदिरामध्ये पूजा करण्यात आली. दुपारी बारा वाजता विधिपूर्वक लक्ष्मीदेवी यात्रेपूर्वी सोडण्यात येणारा रेडा व पालवा यांचे लक्ष्मीदेवी मंदिरासमोर पूजन करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण गावभर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी घरोघरी रेडा व पालव्याचे पूजन केले. सायंकाळी सहा वाजता मिरवणुकीची लक्ष्मी मंदिरासमोर सांगता करून रेडा, पालवा सोडण्यात आला. यापूर्वी 1968 साली यात्रा भरली होती. त्यानंतर तब्बल 58 वर्षानंतर यात्रा भरत आहे. आता सात गावच्या प्रमुख पंचांना बोलावून, सर्वांना विश्वासात घेऊन यात्रा करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
सात गावच्या ग्रामस्थांचा सहभाग
गावात तब्बल पाच तास मिरवणूक काढण्यात आली. यावेळी धनगरी वाद्य, बँड, सनई, हलगी यासह भंडाऱ्याची उधळण करीत मोठ्या उत्साहाने ग्रामस्थ मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यामुळे गावात आतापासूनच यात्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याचा भास होत होता. त्यामुळे ग्रामस्थ आतापासूनच यात्रेच्या तयारीला लागले आहेत.
यात्रा मोठ्या प्रमाणात होणार
तब्बल 58 वर्षांनी सात गावची यात्रा होणार असल्यामुळे सर्वत्र उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. एकाच मार्गावर सात गावे असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढणार आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी आतापासूनच उपाययोजना सुरू आहेत. यासाठी देवस्थान पंच कमिटी, यात्रा कमिटी व ग्रामपंचायत कमिटी परिश्रम घेत आहे.









