नर्स, डॉक्टर वेळेवर येत नसल्याने गैरसोय
वार्ताहर/उचगाव
उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कर्मचारी, नर्स आणि डॉक्टर वेळेत येत नसल्याने ऊग्णांची हेळसांड होत आहे. सध्या हे आरोग्य केंद्र म्हणजे एक शोभेची इमारत असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे. अलीकडच्या काळात या आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर वेळेत येत नसल्याने तसेच परिचारिका आणि इतर कर्मचारी वेळेवर येत नसल्याने हे आरोग्य केंद्र असून नसल्यासारखे झाल्याची स्थिती पहावयास मिळत आहे. या आरोग्य केंद्रामध्ये एक महिला डॉक्टर आहे. त्यांना अनेक कार्यालयीन कामे, बैठका यामुळे त्यांची सातत्याने अनुपस्थिती राहते. मग या ठिकाणी येणाऱ्या ऊग्णांना कोण तपासणार, त्यांची देखभाल कोण करणार, हा मोठा प्रश्न ऊग्णांच्या समोर उपस्थित झाला आहे.
बाळंतिणी वॉर्ड दहा वर्षांपासून बंदच
या आरोग्य केंद्रामध्ये अनेक बाळंतिणी रुग्ण येत असतात. गरीब महिला खासगी रुग्णालयात खर्च परवडत नसल्याने उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसूती विभागात दाखल होत असत. मात्र या आरोग्य केंद्रातील नर्स निवृत्त झाल्यानंतर तो वॉर्ड बंद झाला. सदर प्रसूती वॉर्ड सुरू करावा, अशी मागणी करूनही याकडे दुर्लक्ष झाले आहे.









