विजयकुमार होनकेरी यांचे प्रतिपादन : सुरक्षित इंटरनेट सेवा दिनानिमित्त कार्यशाळा
बेळगाव : सायबर गुन्ह्यांच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत असून याला वेळीच पायबंद घालणे गरजेचे आहे. आरोग्यदायी व सुरक्षित ऑनलाईन सेवा मिळविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. यासाठी समाजात जागृती करण्यात यावी, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी केले. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सुरक्षित इंटरनेट सेवा दिनानिमित्त झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. सायबर गुन्हेगार जनतेची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबित असून याला जनता फशी पडत आहे. त्यामुळे अशा भामट्यांपासून सावध रहाण्याबाबत समाजाला जागृत करणे अत्यंत गरजेचे आहे. इंटरनेटचा वापर कसा करावा याची माहिती देणे गरजेचे आहे. आज इंटरनेटमुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती घरबसल्या मिळत आहे. इंटरनेटचे सदुपयोग करून घेणे महत्त्वाचे आहे. त्याचा दुरुपयोग होत राहिल्यास गुन्हेगारी वाढू शकते. भविष्यात सुरक्षित ऑनलाईन सेवा गरजेची असून इंटरनेट वापरण्याबाबत साधक-बाधक माहिती सर्वसामान्यांना देण्यात आली पाहिजे. या कामासाठी सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सायबर क्राईम विभागाचे एसीपी रघू यांनी गुन्ह्याबाबत जागृत राहण्याचे आवाहन केले. आर्थिक फसवणूक, लैंगिक छळ असे अनेक गैरप्रकार घडत असतात. कोणत्याही कारणास्तव आपली वैयक्तिक माहिती दुसऱ्याला देण्याचे टाळावे. एम. आधार, सायबर दोस्त अॅप, मोबी आर्मर यासारखे अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून वापर केल्यास सायबर फसवणुकीपासून दूर राहता येणे शक्य आहे. एखादी बँक किंवा कंपनीचे नाव सांगून वैयक्तिक माहिती मिळविण्याचे प्रकार सुरू असतात. अशा प्रकारांपासून सावध राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.त्यानंतर एनआयसीचे जिल्हा संयोजक शिरीश खडगदकै व पोलीस कर्मचारी मल्लिकार्जुन यादवाड यांनी मार्गदर्शन केले. एकमेकातील माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी इंटरनेट सुविधा अधिक उपयोगी ठरू शकते. पण इंटरनेटद्वारे आर्थिक फसवणूक, चुकीची माहिती देऊन संबंधितांत संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न घडत असतात. यापासून सावध राहिले पाहिजे. अनोळखी लिंक, बनावट प्रोफाईल यापासून दक्षता घ्यावी. असुरक्षित लिंक किंवा मेलला प्रतिसाद देऊ नये. परवाना मिळविलेल्या स्वॉफ्टवेअरचा वापर करणे, मुदतबाह्य स्वॉफ्टवेअर व हॉर्डवेअर वापरण्याचे टाळावे. कदाचित फसवणूक झाल्याचा संशय आल्यास 1930 या साहाय्यवाणीवर त्वरित संपर्क साधून तक्रार दाखल करावी, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. पोलीस अधिकारी बी. आर. गड्डेकर, लिड बँकेचे व्यवस्थापक प्रकाश यांसह विविध खात्याचे अधिकारी, कर्मचारी कार्यशाळेप्रसंगी उपस्थित होते.









