वृत्तसंस्था / पुणे
2024-25 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मंगळवारी खेळाच्या चौथ्यादिवसा अखेर केरळने दुसऱ्या डावात 2 बाद 100 धावा जमविल्या. केरळला खेळाच्या शेवटच्या दिवशी विजयासाठी आणखी 299 धावांची जरुरी आहे.
या सामन्यात जम्मू काश्मिरने पहिल्या डावात 280 धावा जमविल्यानंतर केरळने पहिल्या डावात 281 धावा जमवित नाममात्र 1 धावेची आघाडी घेतली. त्यानंतर जम्मू काश्मिरने आपला दुसरा डाव 3 बाद 180 या धावसंख्येवरुन पुढे सुरू केला आणि त्यांनी 9 बाद 399 धावांवर डावाची घोषणा करत केरळला निर्णायक विजयासाठी 399 धावांचे आव्हान दिले. जम्मू काश्मिरच्या दुसऱ्या डावात कर्णधार पारस डोग्राने 2 षटकार आणि 13 चौकारांसह 132 धावा झळकविल्या. केरळच्या दुसऱ्या डावात रोहन कुनुमलने 7 चौकारांसह 36 तर अक्षय चंद्रनने 3 चौकारांसह 32 धावा जमविल्या.
संक्षिप्त धावफलक: जम्मू काश्मिर प. डाव 280, केरळ प. डाव 281, जम्मू काश्मिर दु. डाव 9 बाद 399 डाव घोषित, (पारस डोग्रा 132, वाधवान 64, लोथ्रा 59, निदेश 4-89), केरळ दु. डाव 2 बाद 100 (अक्षय चंद्रन नाबाद 32 धावांवर खेळत आहे, युधवीर सिंग 2-31)









