वृत्तसंस्था / राजकोट
2024-25 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मंगळवारी खेळाच्या चौथ्या दिवशी प्रियाजित जडेजा आणि नागवासवला यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर गुजरातने सौराष्ट्रचा एक डाव 98 धावांनी पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. गुजरातच्या जयमित पटेलला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात गुजरातच्या भेदक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर सौराष्ट्रचा दुसरा डाव केवळ 197 धावांवर आटोपला. गुजरातला दुसऱ्या डावात मैदानात फलंदाजीस उतरविण्याकरिता सौराष्ट्रला 295 धावा जमविणे जरुरीचे होते. पण जडेजा आणि नागवासवला या दोघांनी 7 गडी बाद केले. जडेजाने 32 धावांत 4 तर नागवासवलाने 54 धावांत 3 गडी बाद केले.
सौराष्ट्रने बिनबाद 33 या धावसंख्येवरुन चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. हार्विक देसाईने 9 चौकारांसह 54 तर चिराग जेनीने 2 चौकारांसह 26 धावा जमविल्या. वासवदा 11 धावांवर बाद झाला. जॅक्सनने 2 षटकार आणि 2 चौकारांसह 27 तर कर्णधार उनादकटने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 29 धावा केल्या. धर्मेंद्र सिंग जडेजाने 20 षटकात 2 चौकारांसह 18 धावा जमविल्या. गुजरातच्या रवी बिस्नॉईने 30 धावांत 2 तर चिंतन गजाने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: सौराष्ट्र प. डाव 216, गुजरात प. डाव 511, सौराष्ट्र दु. डाव 62.1 षटकात सर्वबाद 197 (हार्विक देसाई 54, चिराग जेनी 26, जॅक्सन 27, उनादकट 29, पी. जडेजा 4-32, नागवासवाला 3-54, बिस्नॉई 2-30, चिंतन गजा 1-34)









