वृत्तसंस्था / नागपूर
2024-25 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारी येथे उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात चौथ्या दिवशी विदर्भ संघाने तामिळनाडूचा 198 धावांनी दणदणीत पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
या सामन्यात विदर्भने पहिल्या डावात 353 धावा जमविल्यानंतर तामिळनाडूचा पहिला डाव 225 धावांवर आटोपला. विदर्भने पहिल्या डावात तामिळनाडूवर 128 धावांची आघाडी मिळविली. विदर्भने 5 बाद 169 या धावसंख्येवरुन चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 272 धावांवर आटोपला. विदर्भच्या दुसऱ्या डावात हर्ष दुबेने 104 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 64, तर यश राठोडने 112 धावांची शतकी खेळी केली. राठोडचे प्रथमश्रेणी क्रिकेटमधील हे पाचवे शतक आहे. त्याने हर्ष दुबे समवेत 120 धावांची भागिदारी केली. तामिळनाडूतर्फे साई किशोरने 78 धावांत 5 गडी बाद केले. विदर्भने तामिळनाडूला निर्णायक विजयासाठी 401 धावांचे कठीण आव्हान दिले. पण तामिळनाडूचा दुसरा डाव 61.1 षटकात 202 धावांवर आटोपल्याने विदर्भने हा सामना 198 धावांनी जिंकला. तामिळनाडूच्या दुसऱ्या डावात प्रदोष रंजन पॉलने 53 तर सोनु यादवने 57 धावा केल्या. विदर्भच्या नचिकेत भुते आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक: विदर्भ प. डाव 353, तामिळनाडू प. डाव 225, विदर्भ दु. डाव 92.3 षटकात सर्वबाद 272 (यश राठोड 112, हर्ष दुबे 64, साईकिशोर 5-78, अजित राम 2-33), तामिळनाडू दु. डाव 61.1 षटकात सर्वबाद 202 (प्रदोष रंजन पॉल 52, सोनु यादव 57, नचिकेत भुते व हर्ष दुबे प्रत्येकी 3 बळी)









