अलीकडेच गेटटुगेदर झाले. बऱ्याच काळानंतर सगळ्या मैत्रीणींची भेट झाली. सगळेच अगदी उत्साहात होते. गप्पाटप्पा, थट्टा मस्करी हे ओघाने आलेच. सगळे अगदी या मोकळेपणाचा आनंद घेत होते. मानसी मात्र अगदी शांत होती. आल्यापासूनच तिच्या चेहऱ्यावर, वागण्याबोलण्यात एक प्रकारची उदासी जाणवत होती. तिला त्याबद्दल खोलात जाऊन विचारल्यानंतर बऱ्याच गोष्टी समोर आल्या. मुलीची परीक्षा, मार्क्स, पुढचे अॅडमिशन या सगळ्याचा ताण तिला जाणवत असल्याचे लक्षात आले. गेले काही दिवस तिला खूप अस्वस्थ वाटत होते आणि आता एकप्रकारची उदासी जाणवू लागली होती. काही नकोच वाटतं गं..इथपर्यंत प्रवास येऊन ठेपला होता. नंतर यावर बरीच चर्चा झाली. यासाठी काय करता येईल, कशा पध्दतीने याकडे पाहता येईल यावर सविस्तर बोलणेही झाले. एकंदरच या साऱ्याकडे पाहण्याचा तिचा दृष्टीकोन, सततचा स्वसंवाद हे सारं जाणून घेतल्यानंतर तणावाच्या व्यवस्थापनासाठीच्या तंत्राविषयी तिला माहिती देत काही दिवस तिच्याशी याबाबत संवाद सुरु राहिला, तिचा सरावही सुरु राहीला. तिनेही या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आणि विचारांची दिशाही बदलली.
एकंदरच वेगाने बदलती जीवनशैली, प्रचंड स्पर्धा, अनेक गोष्टींचे पेव, बोकाळलेला ‘मार्क्सवाद’ आणि मार्क्स असूनही अॅडमिशनची टांगती तलवार या आणि यासारख्या असंख्य गोष्टी, बदललेला दृष्टिकोन अशा अनेक गोष्टी ताण निर्माण करताना दिसतात. ताणाचे प्रमाण वाढले की मानसीसारखी अनेक उदाहरणे समोर येतात.
तीव्र स्पर्धा आणि गतिमान जीवनात कारणे काहीही असली तरी ‘ताण’ हा शब्द परवलीचा झाला आहे. अगदी लहानांपासून वृध्दांपर्यंत तो सावलीसारखा प्रत्येकासोबत पहायला मिळतो आहे. ज्या व्यक्तीला योग्य रीतीने या ताणतणावांचा सामना करण जमतं ते यातून मार्ग काढत, सजग रहात आपल्या शारिरीक आणि मानसिक आरोग्याला हानी पोहचू देत नाहीत. परंतु ज्यांना ते जमत नाही त्यांना शारिरीक, मानसिक स्तरावर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. असं होऊ नये यासाठी ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’ अर्थात ‘ताण व्यवस्थापन कौशल्य’ आत्मसात करुन ते आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनवणं ही काळाची गरज बनी आहे.
खरंतर यापूर्वीही या विषयावर अनेकदा लिहिले आहे तरीही याचे वाढते प्रमाण पाहता या विषयावर लेखन गरजेचे आहे. ताण तणाव हा शब्द आपण अनेकदा ऐकतो परंतु अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर ताण म्हणजे एक प्रकारचा मानसिक दबाव..दडपण वा भार..एकप्रकारची असुखकारक भावना. दडपणाची जाणीव ठेवणारी. शारीरिक आणि मानसिक थकवा आणणारी. ‘ताण’ हा रोग नाही तर ती एक ‘अवस्था’ आहे. मात्र ताणाचं प्रमाण, तीव्रता आणि कालावधी जर जास्त असेल तर मात्र ते विविध रोगांना आमंत्रण ठरु शकते.
तसं पहायला गेलं तर आजच्या या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये आपण सारेच कमी-अधिक प्रमाणात ताण-तणावांचा सामना करत असतो. परीक्षा, अभ्यास, करिअर, नोकरी, व्यवसाय, नाती, कौटुंबीक जीवन, शारीरिक विकासाचे टप्पे अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर उद्भभवणारे अनेक प्रश्न, अनेक गोष्टींसाठी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच ताणतणावाला सामोरे जावे लागते.
अनेकदा साध्या साध्या गोष्टींतूनही ताण उद्भवतो. रोजची कामे, दिनचर्या विस्कळीत झाली तरीही ताण उद्भवतो. विद्यार्थ्यांना परीक्षेचा, मार्क्सचा ताण, पालकांना मुलांचे कसे होईल, अॅडमिशन नीट मिळेल ना याचा येणारा ताण, प्रापंचीक समस्यांमुळे येणारा ताण, तरुणांना नोकरीचा वा तिथे काम करताना येणारा ताण, ऑफीसमधील वर्कलोडचा ताण, वृद्धांना एकटेपणाचा, पुढे आपले कसे होईल वा जोडीदाराच्या मृत्युमुळे आलेले रितेपण याचा ताण अशा अनेक गोष्टी आपण रोज पाहत असतो.
तसं पहायला गेलं तर कुणाचेही आयुष्य ताणविरहीत नसतेच परंतु त्याचे प्रमाण किती आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. खरंतर गतीसाठी थोडा ताण आवश्यक आहेच परंतु त्याचे प्रमाण योग्य असायला हवे. सोपे उदाहरण देऊन सांगायचे तर ताण ‘मीठा’ सारखा हवा. अगदी आवश्यक तेव्हढाच..पहा एखाद्या पदार्थामध्ये मीठ अजिबात नसेल तर तो पदार्थ अर्थातच बेचव लागेल आणि मीठ जास्त झाले तर खाणेही अवघड होऊन जाईल तसेच..अजिबात ताण नसेल तर आपला प्रवास ‘बेफिकीर’ असण्याच्या दिशेने होईल..योग्य ताण योग्य गती देईल मात्र त्याचे प्रमाण जास्त झाले तर मात्र ‘विकारांचे अनेक ब्रेक’ आपल्या जीवनाची गती संथ करतील. त्यामुळे ताणतणावाच्या बाबतीत, एकंदरच भावभावना, त्यांचे बदलते रंग आणि आपले मानसिक आरोग्य याविषयी आपण प्रत्येकाने सजग असणे गरजेचे आहे. ताणाची असंख्य कारणे सांगता येतील परंतु आपण या ताणतणावाशी कसे डील करु शकतो हे पाहणे जास्त गरजेचे आहे.
त्यासाठी स्वत:कडे पाहणं, आत्मपरीक्षण करणेही आवश्यक आहे. पहा, आपण कधी कधी अगदी क्षुल्लक गोष्टींना खूप महत्त्व देतो. खरं पाहिलं तर या गोष्टी इतर अनेक समस्यांच्या तुलनेत अगदीच क्षुल्लक असतात. म्हणजे पहा हं, ‘आपण सकाळी ऑफीसला निघालोय. रस्त्यावरच्या गर्दीतून गाडी घेऊन आपण पुढे सरकत असतो, अगदी काळजीपूर्वक. एखादा माणूस अचानक पाठीमागून येतो आणि जोरजोरात हॉर्न वाजवून मध्येच गाडी घुसवतो. त्याच्या या कृतीने तो त्याला आणि आपल्यालाही धोक्यात आणत असतो. त्यामुळे आपल्याला राग येतो. ‘तो राग येणं अगदी साहजिक आहे’ असं स्वत:शीच आपण समर्थन करतो, त्याला काही सुनावतोही परंतु ते तिथेच संपत नाही, मनातल्या मनात स्वगत सुरुच असते..दीड शहाणा कुठला..आम्ही काय मूर्ख आहोत म्हणून शिस्तीत चाललो होतो का..स्वत:ही धडपडायचं आणि दुसऱ्यालाही खड्ड्यात लोटायचं..वगैरे वगैरे…अनेक गोष्टी आतल्या आत आपण नंतर कितीतरी वेळ बोलत राहतो, ऑफीसला गेल्यावर तिथल्या मित्र मंडळीजवळही याची चर्चा होते..नंतर घरी गेल्यावर अशा बेदरकार वाहनचालकांवर ताशेरेही ओढतो. बराच काळ आपण त्याच क्षणात घोळत राहतो.
परंतु ही सर्व घटना नीट पाहिली तर लक्षात येईल की त्याने अचानक मध्ये वाहन आणल्याने ‘तणावाचा गेलेला त्यावेळेचा तो क्षण’ तिथेच संपला नाही तर तो तणाव पुढे संध्याकाळपर्यंत आपल्या मनावर बाळगल्याने आपल्यालाच त्रास झाला. त्रासा पलीकडे त्यातून काहीच निर्माण झालं नाही. त्यावेळी धोका टळला, सुटलो म्हणून ते सोडून दिले असते तर इतका वेळ अस्वस्थतेचा सामना करावा लागला नसता. शिवाय असाही विचार करावा की, त्या वाहनचालकाच्या घाईमागे कदाचित त्याचेही काही कारण असेल. असा विचार केल्याने आपण शांत होतो आणि अशापद्धतीच्या अगदीच छोट्या छोट्या गोष्टींतून निर्माण होणाऱ्या ताणापासून स्वत:ला बाजूला करु शकतो. ज्यावेळी आपण अगदी आनंदी असतो त्यावेळी वाटतं हे क्षण संपूच नयेत आणि जर काही नावडते, मूड घालवणारे क्षण आयुष्यात आले तर ते पटदिशी नाहीसे व्हावेत असेही वाटते, परंतु एक लक्षात घ्यायला हवे की प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदु:खाचे टप्पे हे येतच असतात. परंतु अगदी हताश होणं किंवा बारीकसारीक गोष्टींवर राग धरणं, रुसणं, अबोला धरणं, आपणहून मानसिक ताण ओढवून घेणं आणि इतरांनाही मनस्ताप देणं हे कितपत योग्य आणि आरोग्यदायी आहे याचा विचार प्रत्येकानेच करायला हवा.
ताण कमी करण्यासाठी तो नेमका का उत्पन्न झाला आहे याचा प्रामाणिक विचार करुन त्यासाठी स्वत:मध्ये बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी मुळात ताणाचे प्रमाण कळणे आवश्यक आहे आणि ते कळण्यासाठी स्वत:च स्वत:च्या मनात डोकावून पाहण्याची गरज आहे. तसं केलं तर नेमकी गल्लत कुठे होते आहे, ताणाची स्थिती का निर्माण होते आहे हे आपल्यालाच लक्षात यायला मदत होईल आणि ताण कमी करण्याच्या दृष्टीने काय करता येईल याचीही जाणीव होण्यास मदत होईल. एक लक्षात घ्यायला हवे की संपूर्णत: ताणविरहीत असं आयुष्य नसतं. परंतु जशी पंख्याची गती आपण आपल्याला सुसह्य असेल तशी ठेवतो तशाच पध्दतीत आपल्याला ताणाच्या बाबतीतही करता यायला हवे. यासाठी काय काय करता येईल याविषयी जाणून घेऊया पुढच्या भागात.
– अॅड. सुमेधा संजिव देसाई








