सातारा :
छावा या सिनेमाची कथा, पटकथा व संवाद यास मराठी इतिहासकार, संशोधक, लेखक, पत्रकार व अभ्यासक यांच्या लेखी संमतीशिवाय चित्रपट प्रदर्शित करू नये. देशातील कित्येक राज्यात स्थायिक असलेल्या सकल मराठा जातींसह शिर्के, राजेशिर्के परिवारासह संपूर्ण भावकी आणि महाराष्ट्रासह देशातील नातेवाईकांचा मानसन्मान न राखणारा चित्रपट असल्यास त्यावर बंदी घालवी, अन्यथा छावा सिनेमाच्या संवादलेखक, लेखक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाची नोटीस उच्च न्यायालयाचे वकील अॅड. देशमुख यांच्यामार्फत छावाचे लेखक दिग्दर्शक उत्तेकर यांना बजावली आहे, अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष अॅड. सुहास राजेशिर्के यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
अॅड. राजेशिर्के म्हणाले, छावा सिनेमा बनवण्यापूर्वी स्वराज्य संस्थापक कुटुंबापैकी शिर्के, राजेशिर्के कुटुंबासह मराठा समाजातील इतिहास संशोधक, मराठ्यांचे इतिहासतज्ञ, अभ्यासक यांच्याशी सल्ला मसलत करुन छावा सिनेमाची कथा, संवाद, पटकथा सर्वासमोर ठेवली नाही. श्रीमंत येसूबाई महाराणीसाहेबांचे माहेर शिर्के/राजेशिर्के यांच्यातील आहे. त्यामुळे त्यांच्या रक्ताचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. देशभर शिर्के/राजेशिर्के घराण्याच्या मानसन्मान आहे. सर्वच ठिकाणी आदर सत्कार होत असतो. महाराणी येसूबाई यांच्या दुर्लक्षित समाधी शोधून शासनाच्या निदर्शनास आणले आहे. महाराष्ट्र शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. क्षत्रिय मराठा, जातीचे असल्याने त्यांचे पूर्वज व ते पूर्वपार शिवपूर्व काळापासून सह्याद्री प्रदेशात राज्य करत होते. त्यांचे स्वतंत्र घोडदळ व आरमार होते. त्यांच्या थोर पराक्रमाचा त्यांना व त्यांच्यासह मराठा समाजाला ही आहे. असे असताना छावा सिनेमाचा अलिकडेच टिझर प्रदर्शित झालेला आहे. त्यात संभाजी महाराजांना नाचताना दाखवून एका शूर राजाचे पात्र हास्यास्पद बनवले आहे. त्या चुकीबाबत आम्ही बोललोच होतो. त्याचबरोबर उदयनराजेंनीही उत्तेरकर यांना फोन करुन तो सिन कट करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे त्या सिनेमाचा जो लेखक, दिग्दर्शक आहे. त्याने एक चूक केली म्हणजे इतरही चुका करु शकतो. त्याकरता त्यांनी अगोदर चित्रपटाची कथा, संवाद लेखन हे राजघराण्यातील व्यक्तींना दाखवुन त्यांच्याकडून संमत करावी.








