पंढरपूर :
पंढरपूर येथे भाविकांची संख्या वाढत असतानाही मंदिर परिसरात स्थानिक लोक तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही काळजी घेतली जात नाही.
मागील काही वर्षांपासून नामदेव पायरी, विणे गल्ली या भागात रस्त्यावरच झुणका भाकर केंद्र, नाश्ता सेंटर, तात्पुरती हॉटेल्स उभी राहत असून उघड्यावरच सिलिंडर ठेवून स्वयंपाक व इतर खाद्यपदार्थ बनविले जात आहेत. ऐन माघ वारीतही हा प्रकार सुरू होता, विशेष म्हणजे या भागातूनच उड्डाणपुलावरून पदस्पर्श दर्शनाची रांग जात आहे. त्यामुळे स्थानिक जनतेसह भाविकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
वारी काळात उघड्यावरच हॉटेल्स थाटली जात आहेत. हा भाग अतिशय दाट लोकवस्तीचा, अरुंद बोळ, गल्ल्यांचा असून हजारो घरे, जुन्या वाड्यातून स्थानिक राहत आहेत. अशावेळी दुर्देवाने जर गॅस सिलिंडर पेटला किंवा गळती झाल्यास किती मोठे नुकसान होऊ शकते याचा अंदाज करणे कठीण आहे.
- मोठ्या अपघाताची शक्यता
सर्वसामान्य व गरीब लोकांचा देव म्हणून श्री विठ्ठल व पंढरी नगरी परिचीत आहे. दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. याचा फायदा घेत अनेकांनी दर्शनरांग असलेल्या भागात उघड्यावरच तात्पुरती हॉटल्स उभी केली असून गॅस सिलिंडर, शेगडी सुरू असते. येथे मोठा अपघात होऊ शकतो.








