जलस्त्रोत खात्याकडे तक्रार आल्याने सुरू झाली कारवाई : बोअरवेल मालकांना नोटीस
पणजी : चिंबल येथील धारवाडकर गृहनिर्माण वसाहतीत सुमारे 60 ते 70 बेकायदेशीर बोअरवेल आणि विहिरी घरगुती वापरासाठी खोदण्यात आल्याची तक्रार अॅना ग्रेसिएस यांनी जलस्त्रोत खात्याकडे केली आहे. हे पाणी बेकायदेशीरपणे विकले जात आहे. तक्रारीला अनुसरून जलस्त्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून दोन टँकर भरणाऱ्या लोकांना रंगेहात पकडले. बोअरवेल मालकांना नोटिस बजावण्यात आली आहे. तसेच वीज विभागाच्या सहाय्यक अभियंत्याना विज जोडणी तोडण्याचे निर्देश दिले आहेत. आता सांताक्रूझ मतदारसंघातील अनेक बेकायदा बोअरवेल सध्या जलस्त्राsत खात्याच्या रडारवर आल्या आहेत.
सांतक्रूझ भागातील सर्व बोअरवेल आणि विहिरींची पाहणी करण्यात येईल नंतर काही चुकीचे आढळून आल्यास पोलिसांच्या मदतीने पाण्याची जोडणी तोडत बोअर वेल्स किंवा विहिरी सील करण्यात येतील. ज्यांनी बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करून बोअर मारल्या असतील त्यांना कायद्यानुसार 5-10 लाखांचा दंड ठोठावण्यात येईल. ज्यांना बोअरवेल किंवा विहिरींची गरज असेल त्यांनी कायदेशीर प्रक्रियांचा अवलंब करत संबंधित खाते आणि अधिकाऱ्यांची रितसर परवानगी घ्यावी, असे जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरेडकर यांनी सांगितले.
एखादा अधिकारी संपूर्ण दिवस फिरून बेकायदेशीर बाबींवर लक्ष ठेवू शकत नाही. त्यामुळे स्थानिकांनी याकामी मदत करणे गरजेचे आहे. असे अन्य एका प्रश्नाचे उत्तर देताना शिरोडकर म्हणाले. तरीही राज्यात एकूण किती बोअर वेल्स आहेत आणि आतापर्यंत खात्याच्या अधिकारी आणि अभियंत्याच्या नजरेखाली या गोष्टी का आल्या नाहीत याचीही मीमांसा केली जाईल, एकंदरीत बेकायदेशीर बोअर आणि विहिरींचा आकडा समोर येताच पुढील कारवाई करू, असे मंत्री शिरोडकर म्हणाले.
तिराळीचे पाणी राजधानीत आणण्याचा विचार
पर्वरीचा 15 एमएलडी जलशुध्दीकरण प्रकल्प तिळारीच्या पाण्यावरच अवलंबून आहे. मांडवी नदीमुळे हे पाणी पुढे पणजी शहापर्यंत घेता आलेले नाही. आता नदीपात्रात पाईपलाईन टाकून ते राजधानी शहरापर्यंत आणण्याचा विचार आहे. असे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले. मांडवी नदीत पाण्याखाली पाईपलाईन टाकली जाईल. खात्याने याबाबत आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. पुढील दोन वर्षात अंमलबजावणी होईल, असेही मंत्री शिरोडकर म्हणाले.









