वृत्तसंस्था/ किंगदाओ (चीन)
पी. व्ही. सिंधूशिवाय आज मंगळवारपासून येथे सुरू होणाऱ्या बॅडमिंटन आशिया मिश्र सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत उतरताना भारताला कठीण आव्हानांना तोंड द्यावे लागेल. दोन वर्षांपूर्वी दुबईमध्ये केलेल्या कांस्यपदक मिळवून देणाऱ्या कामगिरीत सिंधूने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या कामगिरीत सुधारणा करण्याची भारताला आशा आहे.
यावर्षी दुखापतीमुळे सिंधूला खेळता येणार नसून तिची अनुपस्थिती हा संघाला या प्रतिष्ठित द्वैवार्षिक स्पर्धेतील मोहीम सुरू करताना बसलेला मोठा धक्का आहे. 4 फेब्रुवारी रोजी गुवाहाटी येथे झालेल्या स्पर्धेपूर्वीच्या प्रशिक्षण शिबिरादरम्यान सिंधूला धोंडशिरेची दुखापत झाली, ज्यामुळे तिला शेवटच्या क्षणी स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. तिच्या अनुपस्थितीमुळे जागतिक क्रमवारीत 29 व्या क्रमांकावर असलेल्या मालविका बनसोडवर महिला एकेरीत चांगली कामगिरी करून दाखविण्याची जबाबदारी वाढली आहे.
गट ‘ड’मध्ये स्थान मिळालेला भारत बुधवारी मकाऊविऊद्ध आपला मोहीम सुरू करेल आणि त्यानंतर गुऊवारी एका मजबूत कोरियन संघाशी सामना करेल. गटात पहिल्या दोन स्थानांवर राहिल्यास त्यांचे उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित होईल. भारत अंतिम आठ संघांत पोहोचण्याची शक्यता असून पुढे जाण्यासाठी मात्र संघाकडून अपवादात्मक कामगिरी घडण्याची आवश्यकता भासेल. भारताने आशिया मिश्र सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत कधीही सुवर्णपदक जिंकलेले नसले, तरी 2018 आणि 2022 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांत त्यांनी मिश्र सांघिक गटात अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवले होते.
भारताला अलीकडच्या सांघिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळाले आहे. यामध्ये 2022 साली मिळविलेले पहिले थॉमस चषक जेतेपद, मलेशियात 2024 मध्ये झालेल्या बॅडमिंटन आशिया सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत मिळविलेले रौप्यपदक आणि हांगझाऊ, चीन येथे झालेल्या आशियाई खेळांत पुरुष गटात मिळविलेले ऐतिहासिक रौप्यपदक यांचा समावेश होतो. एच. एस. प्रणॉय, लक्ष्य सेन, अश्विनी पोनप्पा, सात्विकसाईराज रान्कीरे•ाr आणि चिराग शेट्टी यांच्यासह त्या विजयांत वाटा उचललेले प्रमुख खेळाडू या संघात आहेत आणि प्रभावी कामगिरी करण्याच्या दृष्टीने साऱ्यांचे लक्ष त्यांच्यावर असेल.
सात्विकसाईराज आणि चिराग यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करताना मलेशिया ओपन आणि इंडिया ओपनमध्ये उपांत्य फेरी गाठली, तर ऑलिंपिकनंतर खेळताना प्रणॉयला दुखापतींचा सामना करावा लागलेला आहे. दुसरीकडे, सय्यद मोदी स्पर्धेतील विजेता लक्ष्य या हंगामातील काही स्पर्धांत पहिल्या फेरीतच बाहेर पडलेला असून त्याला लवकर त्याचा फॉर्म परत मिळवावा लागेल.









