अमेरिका अध्यक्ष ट्रंप यांनी स्वीकारले कठोर धोरण
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी गाझा पट्टी सोडलेल्या पॅलेस्टाईनी लोकांसंबंधी अधिकच कठोर धोरण स्वीकारले आहे. इस्रायलशी युद्ध होत असलेल्या काळात ज्या पॅलेस्टाईनी नागरीकांनी गाझा पट्टी सोडून अन्य देशांमध्ये आश्रय घेतला आहे, त्यांना गाझा पट्टीत परत येऊ दिले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी सोमवारी दिला आहे. गाझा पट्टी अमेरिकेच्या आधीन करुन घेण्याची ट्रंप यांची योजना असून इस्रायलने या योजनेला पूर्ण पाठिंबा दिला आहे.
पॅलेस्टाईनी लोकांना आश्रय देणाऱ्या देशांमध्येच त्यांच्यासाठी आधुनिक वस्त्या निर्माण करण्याची अमेरिकेची योजना आहे. याच देशांमध्ये त्यांच्यासाठी स्थायी निवासाची व्यवस्था अमेरिकडून करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. गाझा पट्टी अमेरिकेच्या ताब्यात घेण्याच्या योजनेचाही त्यांनी पुनरुच्चार केला. गाझा पट्टीमध्ये नव्या बांधकामांना मोठा वाव आहे. युद्धामुळे तेथे मोठी हानी झाली आहे. असंख्य इमारती पडल्या आहेत. त्यांच्या स्थानी नवी बांधकामे केली पाहिजेत. हे व्यापक काम असून ते अमेरिकाच करु शकते. ते करण्यासाठी आवश्यकता असेल तर अमेरिका आपले सैनिक गाझा पट्टीत उतरविण्यास सज्ज असेल, अशीही स्पष्टोक्ती त्यांनी केल्याने पुढील काही काळात अमेरिका या क्षेत्रात कोणती पावले उचलणार, याविषयी साऱ्या जगात उत्सुकता निर्माण झाली आहे.
त्यांनी इजिप्त, जॉर्डनमध्ये जावे
गाझा पट्टीतील पॅलेस्टाईनींनी इजिप्त किंवा जॉर्डन यांसारख्या देशांमध्ये आश्रय घेतला पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली. मात्र, या दोन्ही देशांनी हा प्रस्ताव नाकारला आहे. पण ट्रंप आपल्या प्रस्तावावर ठाम आहेत. इस्रायलने ट्रंप यांच्या या योजनेला सक्रीय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रंप हे इस्रायलचे सर्वात मोठे मित्र आहेत, हे त्यांच्या या योजनेवरुन दिसून येत आहे. आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करु. गाझा पट्टी अमेरिकेने आपल्या स्वामित्वात घेतल्यास या भागात स्थायी शांतता प्रस्थापित होण्यास साहाय्य होईल, तसेच गाझा भागाचा विकासही होईल, अशी प्रतिक्रिया इस्रायलचे नेते बेंजामिन नेतान्याहू यांनी व्यक्त केली आहे.









