वृत्तसंस्था / तिरुपती
काही महिन्यांपूर्वी उघड झालेल्या तिरुपती देवस्थान प्रसाद लाडू भेसळ प्रकरणी सीबीआयने कारवाई वेगवान केली असून चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही माहिती आंध्र प्रदेशात सत्ताधारी असणाऱ्या तेलगु देशम या पक्षाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनीच हे प्रकरण उघडकीस आणले होते. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले आहे.
या प्रकरणाची चौकशी आता सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत होत आहे. सीबीआयने यासाठी विशेष दलाची स्थापना केली आहे. ज्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे, ते देवस्थानाला भेसळयुक्त तूप पुरविण्याचा आरोप असणाऱ्या कंपन्यांशी संबंधित आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
प्रकरण काय आहे…
जगप्रसिद्ध तिरुपती देवस्थानात प्रसाद म्हणून वितरीत करण्यात येणारे लाडू बनविण्यासाठी लागणाऱ्या तुपात गाय आणि इतर प्राण्यांची चरबी, तसेच माश्यांचे तेल यांचे अंश आढळून आले होते. भारतातील चार अधिकृत प्रयोगशाळांनी या संबंधीचा अहवाल सादर केला होता. हा भेसळीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या देवस्थानात येणाऱ्या देशभरातील आणि जगातील कोट्यावधी भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे राज्य शासनाने त्वरित सीबीआय चौकशीची घोषणा केली होती. काही भक्तांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वत:च्या देखरेखीत चौकशी करण्याचा आदेश सीबीआयला दिला होता. तेव्हापासून चौकशी केली जात आहे.
प्रत्येक पातळीवर गैरप्रकार
सीबीआयच्या विशेष अन्वेषण दलाने (एसआयटी) या प्रकरणाच्या चौकशीला प्रारंभ केल्यानंतर अनेक गंभीर गैरप्रकार दलाच्या दृष्टीला पडत आहेत. लाडूंसाठी तूप पुरवठा करणाऱ्या साखळीत प्रत्येक स्तरावर नियमांचा भंग करण्यात आला आहे, असे दलाला आढळले आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.
चार कंपन्यांवर लक्ष
तामिळनाडूची एआर डेअरी, उत्तर प्रदेशातील पराग डेअरी, प्रिमीअर अॅग्री फूडस् आणि अल्फा मिल्क फूडस् या चार कंपन्या या प्रकरणातील प्रमुख संशयित आहेत. या चार कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. वैष्णवी डेअरी या कंपनीने तामिळताडूतील एआर डेअरीच्या नावाने तूप पुरवठा करण्याची निविदा घेतली. या कंपनीने निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा केला असून त्यासाठी अनेक कागदपत्रांमध्ये बेकायदा फेरफार केल्याचे अन्वेषण दलाला आढळल्याची माहिती देण्यात आली. वैष्णवी डेअरी या कंपनीने भोले बाबा डेअरीतून तूप खरेदी केल्याचे कागदोपत्री दाखविले. तथापि, भोले बाबा डेअरीची तूप पुरविण्याची क्षमताही नव्हती, असे तपासात स्पष्ट झाल्याने हा सर्वच व्यवहार संशयास्पद ठरला आहे.
कोणाला अटक ?
या प्रकरणी भोले बाबा डेअरीचे माजी संचालक बिपीन जैन आणि पोमिल जैन, वैष्णवी डेअरीच्या माजी संचालिका अपूर्वा विनयकांत चावडा आणि एआर डेअरीचे अधिकारी राजू राजशेखरन यांचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे. सीबीआयचे सहसंचालक वीरेन प्रभू सध्या तिरुपती देवस्थानातच वास्तव्यास असून हा तपास चालवित आहेत. आरोपींची अटक झाल्यानंतर तीन दिवस कसून चौकशी करण्यात आली. मात्र, त्यांनी चौकशीत सहकार्य केले नाही. त्यांच्या विरोधात भक्कम पुरावा असूनही त्यांनी सहकार्य न केल्याने पुढची कारवाई करण्यात येत आहे.









