मूल्य वाढीत एचडीएफसी बँक, भारती एअरटेल अग्रभागी : आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
आघाडीवरच्या दहा पैकी सहा मौल्यवान कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यात 1 लाख 18 हजार 151 कोटी रुपयांनी वाढले असल्याचे पाहायला मिळाले आहे. यामध्ये एचडीएफसी बँक आणि भारती एअरटेल या कंपन्यांच्या बाजार मूल्यामध्ये मोठी वाढ झालेली दिसून आली आहे.
सेन्सेक्स होता 354 अंकांनी तेजीत
मागच्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 354 अंकांनी म्हणजेच 0.45 टक्के इतका वाढला होता. यातुलनेमध्ये निफ्टी निर्देशांक देखील 77 अंकांनी म्हणजेच 0.33 टक्के वाढला होता. बाजारातील कंपन्यांच्या कामगिरीचा विचार करता रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस आणि बजाज फायनान्स या कंपन्यांच्या बाजार मूल्यामध्ये वाढ झालेली दिसून आली. दुसरीकडे टीसीएस, स्टेट बँक ऑफ इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी यांचे बाजार भांडवल मूल्य मात्र घसरणीत राहिलेले दिसून आले. या चारही कंपन्यांचे बाजार मूल्य मागच्या आठवड्यात एकत्रितरित्या 1.15 लाख कोटी रुपयांनी कमी झाले होते.
यांचे भांडवल मूल्य वाढले
एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल मूल्य 32639 कोटी रुपयांनी वाढत 13 लाख 25 हजार 90 कोटी रुपयांवर पोहोचले. दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलचे बाजार भांडवल मूल्य 31 हजार 3 कोटी रुपयांनी वाढत 9 लाख 56 हजार 205 कोटी रुपयांवर स्थिरावले. बजाज फायनान्सचे बाजार मूल्य 29 हजार 32 कोटी रुपयांनी वाढत 5 लाख 24 हजार 312 कोटी रुपयांवर तर इन्फोसिसचे बाजार भांडवल मूल्य 21 हजार 114 कोटी रुपयांनी वाढत 7 लाख 90 हजार 74 कोटी रुपयांवर पोहोचले होते.
भांडवल मूल्यामध्ये आघाडीवरची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल मूल्य 2977 कोटी रुपयांनी वाढत 17 लाख 14 हजार 348 कोटी रुपयांवर पोहोचले होते तर आयसीआयसीआय बँकेचे बाजार मूल्य 1384 कोटी रुपयांनी वाढत 8 लाख 87 हजार 632 कोटी रुपयांवर पोहोचले.
यांचे मूल्य मात्र घटले
दुसरीकडे एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी आयटीसीचे बाजार भांडवल मूल्य मात्र 39 हजार 774 कोटी रुपयांनी कमी झालेले दिसून आले. अशा रीतीने आयटीसीचे एकूण बाजारमूल्य 5 लाख 39 हजार 129 कोटी रुपयांवर स्थिरावले होते. हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल मूल्य सुद्धा 33 हजार 704 कोटी रुपयांनी कमी होत 5 लाख 55 हजार 361 कोटी रुपयांवर राहिले होते.









