रिक्षा चोरीमुळे चालकासह नागरिकांची धावाधाव,
दुसऱ्या रिक्षातून केला पाठलाग,
सराईत चोरट्याला पकडण्यात यश
सातारा
रविवार हा सुट्टीचा वार तसेच साताऱ्याचा आठवडी वार असल्यामुळे नेहमीपेक्षा रविवारी शहरात गर्दी होती. त्यात पोवईनाका, रविवार पेठ हे तर कायम वर्दळीचे ठिकाण. सकाळी 11.30 च्या दरम्यान, एक रिक्षा भाडे मिळण्यासाठी सुलक्षा प्लाझा येथे नेहमीच्या ठिकाणी उभा होता. रिक्षाला चावी ठेवताच तो आपल्या ओळखीच्या व्यक्तीशी बोलण्यासाठी रिक्षातून खाली उतरुन बाजूला उभा होता. तोच पाठीमागून आलेल्या एका चोरट्याने रिक्षा चावी असल्याचे पाहून त्याच संधीचा फायदा घेतला. अन् क्षणार्धातच रिक्षा सुरू करुन पलायन केले. तो आला काय…, रिक्षा सुरू केली काय…, अन् रिक्षा घेऊन पलायन केले काय… या घटनेमुळे रिक्षा चालक गांगरला आणि रिक्षा चोरीला गेली असा आरडाओरडा करत रिक्षामागून पळायला लागला. अखेर त्याच्या प्रयत्नाला यश आले आणि संबंधित चोरटा पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, गेल्या काही दिवसापुर्वी भरदिवसा सातारा शहरातील काही भागातून मोबाईल फोन चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या चोरीच्या घटनांना काहीच महिने झाले आहेत. तोच रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अशीच चोरीची घटना पोवईनाका परिसरातील रविवार पेठेत घडली. नेहमीप्रमाणे रिक्षा चालक आण्णा शंकर निकम (रा. तामजाईनगर सातारा) हे रिक्षा घेऊन रविवार पेठेत आले. सुलक्षा प्लाझा या अपार्टमेंट समोरील रस्त्यावर त्यांनी रिक्षा उभी केली. रिक्षाला चावी लावून ते रिक्षातून खाली उतरले. त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीशी ते बोलत होते. इतक्यात एक चोरटा पायी चालत आला. त्याने रिक्षाच्या हॅन्डलला चावी बघून थेट रिक्षात बसला. अवघ्या काही सेंकदात त्याने रिक्षा सुरू केली. अचानक रिक्षा कशी सुरू झाली हे आण्णा निकम यांना कळायच्या आधी त्याने भरधाव वेगाने रिक्षा पळवली. हे पाहून आण्णा रिक्षाच्या मागे थांब, थांब, रिक्षा नेली असे ओरडत पळाले. हे पाहून परिसरात एकच गोंधळ उडाला. कोणालाही काहीच कळेना. क्षणात भीतीचे वातावरण पसरले.
रिक्षा चालक पवार मदतीला धावले…
इतक्यात रिक्षा चालक शंकर तुकाराम पवार (रा. धावडशी ता. सातारा) हे पाठीमागून रिक्षा घेऊन आले. त्यांना रिक्षा चोरीचा प्रकार कळताच त्यांनी आण्णा निकम यांना रिक्षात बसण्यास सांगितले. आण्णा हे रिक्षात बसताच चालक पवार यांनी रिक्षाचा पाठलाग केला. चोरटा भरधाव वेगाने रिक्षा चालवत थेट मार्केट यार्ड परिसरात गेला. या ठिकाणी असलेल्या वाहतूक पोलिसांनी भरधाव वेगाने रिक्षा येत असल्याचे पाहून त्याला अडवले. आणि रिक्षातून बाहेर घेऊन चौकशी केली. इतक्यात निकम व पवार हे दोघेही तिथे पोहोचले. त्यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. नंतर त्या चोरट्याला सातारा शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्या विरूद्ध निकम यांनी तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल झाला.
याच्या आधीही वाहन चोरीचा प्रयत्न
रविवार पेठेतून रिक्षा चोरीची प्रयत्न करणारा चोरटा हा दारूचे सेवन करतो. तो सतत नशेत असतो. पोवईनाका परिसरातील कासट मार्केट येथील रहिवाशी आहे. या आधी त्याने असेच वाहन चोरीला प्रयत्न केला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. याच परिसरातून गेल्या महिन्यांपूर्वी एका पार्किंग केलेल्या कारमधून पिशवी गायब झाली होती. ती पिशवी याच संबंधितांने गायब केल्याचे सीसीटीव्हीत उघड झाले होते. त्यानंतर चौकशीअंती ही पिशवी कोठे ठेवल्याचे सांगितल्यानंतर ती पिशवी सापडली. त्या पिशवीमध्ये दागिने होते.
दरम्यान, त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु वारंवार असे गुन्हे करणाऱ्या सराईत चोरट्याचे नाव पोलिसांनी का सांगितले नाही, तसेच यापूर्वीच्या गुन्ह्यात त्याला अटक का झाली नाही, असे प्रश्न अनुत्तरीत आहेत.
आता तुम्हीच घ्या काळजी…
गेल्या काही दिवसापासून सातारा जिह्यात भरदिवसा घरफोडी, दुचाकी, चेन स्नेचिंग, पोलीस असल्याचे सांगून फसवणूक, प्रवासादरम्यान दागिने, पैशाची चोरी याचे प्रमाण वाढले आहे. दिवस घडणाऱ्या या घटनांमुळे सर्वत्र भितीचे वातावरण पहायला मिळत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आता तुम्हीच तुमच्या पैशांची, दागिने, वाहनांची काळजी घ्या असे म्हणण्याची वेळ आली आहे. तुमचा निष्काळजीपणा तुम्हाला अडचणीत आणत आहे, हे ही तितकेच खरे आहे.








