राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा
अंतिम लढतीत पुण्याच्या प्रगती गायकवाडला हरवले
अडीच लाखांचा धनादेश, दुचाकी गाडी व चांदीचा गदा बक्षीस देऊन गौरव
कोल्हापूर
राज्यपातळीवर झालेल्या हिंदू गर्जना केसरी महिला कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुरगुडची सतरा वर्षीय राष्ट्रीय मल्ल अपेक्षा विठ्ठल पाटीलने पुण्यातील आंतरराष्ट्रीय मल्ल प्रगती गायकवाडला 3-2 गुणफरकाने पराभूत करून केसरीचा किताब पटकावला. पुनित बालन ग्रुप व हिंदू गर्जना प्रतिष्ठान यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानात तयार केलेल्या मातीच्या आखाड्यात मॅटवरील नियमांनुसार ही स्पर्धा झाली.
अपेक्षाने मुरगुडमधील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय साई कुस्ती संकुलातर्फे स्पर्धेत प्रतिनिधीत्व केले होते. स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील कुस्तीत अपेक्षाने बिद्री (ता. कागल) येथील सृष्टी भोसलेला 8-2 गुणफरकाने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीतही अपेक्षाने प्रगतीला हरवून हिंदू गर्जना केसरीचा किताब पटकावला. बक्षीस वितरण समारंभात अपेक्षाला 2 लाख 51 हजार रुपयांचा धनादेश, दुचाकी गाडी व चांदी गदा देऊन गौरवले. कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, अभिनेता अंकुश चौधरी, उद्योजक पुनीत बालन व भाजपचे पदाधिकारी धीरज घाटे यांच्या अपेक्षाने बक्षीसे स्वीकारला. अपेक्षाला मंडलिक कुस्ती संकुलाचे सर्वेसर्वा व माजी खासदार संजय मंडलिक, कार्याध्यक्ष विरेंद्र मंडलिक, वस्ताद सुखदेव येऊडकर व प्रशिक्षक दादासाहेब लवटे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Previous Articleडंपरच्या धडकेने दुचाकीवरील
Next Article महाराष्ट्र कुस्ती मैदानात गौरव माच्छिवार विजयी








