गडहिग्लजमधील गावांचा समावेश
आजऱ्यातील रामलिंग मंदिरास ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ घोषित
कोल्हापूर
जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील मौजे मडिलगे येथील पांडवकालिन रामलिंग मंदिर देवालय परिसरास पर्यटन स्थळास ‘क‘ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच गडहिंग्लज तालुक्यातील ६ गावांना यात्रा स्थळांना क वर्ग यात्रास्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत यास मान्यता देण्यात आली आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली २ फेब्रुवारी रोजी झालेल्या पहिल्या जिल्हा नियोजन समितीमध्ये अनेक महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली. २०२४-२५ आर्थिक वर्षातील मंजूर निधीपैकी ९६ टक्के निधी खर्च झाला आहे. असे असले तरी पहिल्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये पर्यटनाविषयांचा समावेश आहे.
कोल्हापूरमध्ये अनेक धार्मिक स्थळांचा विकास करताना दक्षिण काशीच्या धर्तीवर तो केला जाईल. सर्व नियोजित कामे मार्गी लावून स्थानिक गरजांच्या अनुषंगाने येत्या काळात विकासकामे केली जातील, असे सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले. यावेळी त्यांनी चंदगड येथील मागणीनुसार पाच एसटी बसेस देण्याचे जाहीर केले.
जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता यांनी सादर केलेल्या आजरा तालुक्यातील मौजे मडिलगे येथील पांडवकालिन रामलिंग मंदिर देवालय परिसरास पर्यटन स्थळास ‘क‘ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी सादर केलेल्या गडहिंग्लज तालुक्यातील 6 गावांना यात्रा स्थळांना ‘क’ वर्ग यात्रास्थळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
‘क’ वर्ग यात्रास्थळाचा दर्जा मिळालेली मंदिर
हसुर चंप्पू गावातील श्री. हनुमान मंदिर, हनिम्मनाळ गावातील श्री. हनुमान मंदिर, कनुल गावातील श्री. बीरदेव मंदिर, कनुल गावातील हजरत इब्राहिम चिस्तीया तीर दर्गा, हेब्बाळ कनुल गावातील श्री. रामलिंगेश्वर मंदिर व दुंडगे गावातील श्री. हनुमान मंदिर
क वर्ग पर्यटनस्थळ घोषित करण्यासाठी नियमावली
‘क‘ वर्ग पर्यटनस्थळासाठीचे नवे निकषप्रस्तावित पर्यटनस्थळास दरवर्षी किमान एक लाख पर्यटकांनी भेट दिलेली असावी, पर्यटक संख्या पोलिस अधीक्षक, आयुक्तांकडून प्रमाणित असली पाहिजे. स्थळास ऐतिहासिक, नैसर्गिक किंवा भौगोलिक महत्त्व असले पाहिजे. कोणत्याही पर्यटन, तीर्थक्षेत्र, यात्रास्थळी, जत्रास्थळी एकाच प्रासंगिक यात्रेसाठी येणारी संख्या ‘क‘ वर्ग देण्यास पुरेशी नाही. तेथे इतर दिवशीही पर्यटक येणे अपेक्षित आहे. ‘क‘ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यापूर्वी त्या ठिकाणी किमान मूलभूत सुविधा (जाण्याचा रस्ता, पिण्याच्या पाण्याची सोय, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन इ.) उपलब्ध असल्याची खातरजमा करावी, ‘क‘ वर्ग पर्यटनस्थळ घोषित करण्याच्या प्रस्तावासोबत जागेची मालकी, उपलब्ध क्षेत्राबाबत स्पष्ट माहिती द्यावी लागते.
पर्यटनस्थळी मूलभूत सुविधेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात येतो. विधानसभा क्षेत्रनिहाय एक किंवा दोन वैशिष्ट्यापूर्ण पर्यटनस्थळी मूलभूत सुविधा निर्माण करून त्यांच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांपर्यंतचे प्रस्ताव पर्यटन संचालनालयास पाठवायचे आहेत.








