इंदूरमधून बेळगावात मृतदेह दाखल, मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन
प्रतिनिधी / बेळगाव
मध्यप्रदेशमधील इंदूरनजीकच्या मानपूरजवळ शुक्रवारी पहाटे तिहेरी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बेळगाव येथील चारही भाविकांचे मृतदेह रविवारी दुपारी बेळगावला पोहोचले आहेत. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
24 जानेवारी रोजी काशी, अयोध्यासाठी बेळगाव येथून टेम्पो ट्रॅव्हलरमधून 21 जण रवाना झाले होते. उत्तर भारताचा प्रवास आटोपून उज्जैन महाकालेश्वराचे दर्शन घेऊन हे सर्व भाविक साईबाबाच्या दर्शनासाठी शिर्डीला जात होते. त्यावेळी शुक्रवारी पहाटे दुचाकीला ठोकरून टेम्पोची टँकरला धडक बसल्याने हा अपघात घडला होता.
ज्योती प्रकाश खेडेकर (वय 64), रा. आनंदनगर–वडगाव, टेम्पोचालक सागर परशराम शहापूरकर (वय 40) रा. होसूर, बसवाण गल्ली, निता भाऊ बडमंजी (वय 43), रा. क्रांतीनगर–गणेशपूर, संगीता चंद्रकांत तेली (वय 48), रा. शिवाजीनगर या चौघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
इंदूरमधून सर्व चार मृतदेह रविवारी दुपारी बेळगावला पोहोचले. येथील स्थानिक पोलीस व सनदी अधिकारीही मृतदेह पोहोचविण्यासाठी बेळगावला आले होते. वडगाव, शहापूर, गणेशपूर व शिवाजीनगर परिसरातील मृतांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांकडे मृतदेह सोपविले. स्थानिक नेते, लोकप्रतिनिधींनी अत्यंदर्शन घेतले.
मृतदेह त्यांच्या त्यांच्या निवासस्थानी पोहोचताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. अंत्यदर्शन झाल्यानंतर धार्मिक विधी पूर्ण करून शोकाकुल वातावरणात शहरातील वेगवेगळ्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, अपघातातील जखमींना बेळगावला आणण्यासाठी नातेवाईक इंदूरला रवाना झाले आहेत.









