पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावरून परतल्यानंतर दिल्लीत नवे मुख्यमंत्री शपथ घेणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील भाजपचा 27 वर्षांचा दुष्काळ संपला आहे. भाजपने 48 जागा जिंकत स्पष्ट बहुमत संपादन केल्यानंतर आता सत्तास्थापनेसाठीचे पुढील डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. विधिमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी लवकरच बैठक होणार आहे. तत्पूर्वी पक्षाच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावणारे नेते आता केंद्रातील ज्येष्ठ नेत्यांच्या संपर्कात राहून मुख्यमंत्री निवडीच्या प्रक्रियेला गती देत आहेत.
दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ 13 फेब्रुवारी नंतर होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ते 13 फेब्रुवारी दरम्यान फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर असतील. 27 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर भाजप दिल्लीत सरकार स्थापन करणार आहे. नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहावेत अशी पक्षाची इच्छा आहे. त्यामुळे शपथविधी सोहळा 13 फेब्रुवारीनंतर होणार आहे.
भाजपमध्ये मुख्यमंत्री कोण असेल यावरून विचारमंथन सुरू झाले आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. न•ा रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी पोहोचले होते. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. या बैठकीत दिल्लीच्या नवीन सरकारच्या रूपरेषेवर चर्चा झाल्याचे मानले जाते. त्याचवेळी, प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनीही रविवारी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावून प्राथमिक चर्चा केली. तसेच सर्व नवनिर्वाचितांचे विजयाबद्दल अभिनंदनही केले. यापूर्वी शनिवारी संध्याकाळी भाजप कार्यालयात विजयाचा जल्लोष करण्यात आला.
मुख्यमंत्री निवडण्याचा निर्णय पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून घेतला जाईल, असे सचदेवा यांनी स्पष्ट केले आहे. सर्व नवनिर्वाचित आमदार पक्षाने त्यांना दिलेली जबाबदारी पार पाडण्यास सक्षम आहेत. दरम्यान, दिल्लीतील भाजप खासदार मनोज तिवारी यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर आमचे प्राधान्य यमुना स्वच्छ करणे हेच असेल असे स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्र्यांबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल. मुख्यमंत्री कोणीही असो, तो दिल्लीतील लोकांसाठी काम करेल आणि पंतप्रधान मोदींनी जनतेला दिलेल्या हमी पूर्ण करेल, असे तिवारी म्हणाले.
शपथविधीला एनडीए नेते उपस्थित राहणार
दिल्लीतील नवीन सरकारचा शपथविधी सोहळा भव्य होईल असे मानले जात आहे. त्यामुळे थोडा वेळ घेतला जात आहे. या कार्यक्रमासाठी एनडीए नेत्यांना आमंत्रित केले जाईल. यासोबतच, एनडीएशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री देखील शपथविधी सोहळ्यात सहभागी होतील.
दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार?
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर भाजप हायकमांड मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याचा विचार करत आहे. यासाठी लवकरच विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली जाईल, ज्यामध्ये विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाईल. पण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्यांमध्ये पहिले नाव प्रवेश वर्मा यांचे आहे. वर्मा यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला होता. मुख्यमंत्री निवडीमध्ये भाजपने शीख चेहऱ्याला प्रोत्साहन दिले तर मनजिंदर सिंग सिरसा यांचे नाव पुढे येऊ शकते. प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांचे नावही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे.









