सहकारी मंत्र्यांसह घेतली राज्यपालांची भेट : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर निर्णय
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी इंफाळ येथील राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. याप्रसंगी भाजप खासदार संबित पात्रा, मणिपूर सरकारचे मंत्री आणि काही निवडक आमदार उपस्थित होते. या निर्णयापूर्वी बिरेन सिंग यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली होती. अमित शहा यांच्या निर्देशांनंतरच त्यांनी मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. आता मुख्यमंत्रिपदाची माळ अन्य कोणाच्या गळ्यात घातली जाते की राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाते याबाबत औत्सुक्य आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये तणाव कायम आहे. मे 2023 मध्ये राज्यात कुकी आणि मैतेई या दोन समुदायांमध्ये झालेल्या संघर्षापासून आंदोलनाची धग कायम राहिली होती. अलिकडेच मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राज्यातील जातीय हिंसाचाराबद्दल लोकांची माफी मागितली होती. आपल्याला संपूर्ण वर्ष खूप वाईट गेले. 3 मे 2023 पासून आजपर्यंत जे काही घडले त्याबद्दल मी राज्यातील जनतेची माफी मागतो. अनेकांनी आपले प्रियजन गमावले. अनेक लोक आपली घरे सोडून गेले. मला याबद्दल वाईट वाटते. गेल्या तीन-चार महिन्यांतील शांततापूर्ण परिस्थिती पाहून त्यांनी 2025 मध्ये राज्यात सामान्य स्थिती पूर्ववत होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला होता. मात्र, आता त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा त्याग केला आहे.
राज्यपालांना सादर केलेल्या राजीनामापत्रात त्यांनी मणिपूरच्या लोकांची सेवा करणे हा माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असल्याचे म्हटले आहे. मणिपूरच्या प्रत्येक नागरिकाचे हित जपण्यासाठी केंद्र सरकारच्या वेळेवर केलेल्या कृती, हस्तक्षेप, विकास कामे आणि विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच अन्य अनेक अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत. हजारो वर्षांचा समृद्ध आणि सुसंस्कृत इतिहास असलेल्या मणिपूरची प्रादेशिक अखंडता राखली पाहिजे. सीमेवरील घुसखोरी थांबवावी आणि बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून बाहेर काढण्यासाठी धोरण बनवावे. अमली पदार्थांच्या व्यसन आणि अमली पदार्थांच्या दहशतवादाविरुद्धची लढाई सुरूच ठेवली पाहिजे. एमएफआरची एक नवीन कडक आणि पूर्णपणे सुरक्षित प्रणाली लागू करावी ज्यामध्ये बायोमेट्रिक पडताळणी काटेकोरपणे केली पाहिजे. तसेच सीमेवरील काम वेळेवर आणि जलद गतीने सुरू ठेवावे, असे त्यांनी म्हटले आहे.
हिंसाचारामुळे बिरेन सिंग दबावाखाली
मे 2023 पासून मणिपुरात जातीय हिंसाचार सुरू राहिल्यामुळे आतापर्यंत 200 हून अधिक लोक मारले गेले आहेत. हजारो लोक विस्थापित झाले आहेत. नोव्हेंबरमध्ये मणिपूरमधील जिरीबाम येथे तीन महिला आणि त्यांच्या तीन मुलांची हत्या झाल्यानंतर गोंधळ उडाला. राज्यात सतत सुरू असलेल्या हिंसाचारामुळे एन. बिरेन सिंग यांच्यावर प्रचंड दबाव होता. त्यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी जोर धरत होती. एनडीएचा सहयोगी पक्ष एनपीपीनेही मणिपूर सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेत नेतृत्व बदलण्याची मागणी केली होती.
हिंसाचाराची धग कायम
मणिपूरमधील मैतेई समुदाय आणि कुकी समुदायामध्ये 3 मे 2023 रोजी हिंसाचार सुरू झाला. भारतीय आदिवासी विद्यार्थी संघाने (एटीएसयुएम) मणिपूर उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध रॅलीचे आयोजन केले होते ज्यामध्ये मणिपूर समुदायाला अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करण्याचा विचार करण्याचे सरकारला निर्देश देण्यात आले होते. तेव्हापासून राज्यात हिंसाचार सुरूच असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारला निमलष्करी दल तैनात करावे लागले. कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करूनही दीड वर्षांपासून सुरू असलेला तणाव पूर्णपणे रोखण्यात राज्य आणि केंद्र सरकारला यश प्राप्त झालेले दिसत नाही.









