नरेंद्र मोदी आजपासून प्र्रान्स दौऱ्यावर : तेथूनच अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान फ्रान्सच्या दौऱ्यावर जात आहेत. या भेटीचा मुख्य उद्देश फ्रान्सने आयोजित केलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) शिखर परिषदेत सहभागी होणे आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी या शिखर परिषदेला उपस्थित राहणार असून ते या परिषदेचे सह-अध्यक्षपदही भूषवतील. दोन दिवसांचा फ्रान्स दौरा आटोपून पंतप्रधान थेट अमेरिकेला रवाना होणार असून नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत.
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी, पंतप्रधान मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या राष्ट्रप्रमुख आणि इतर प्रमुख नेत्यांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला उपस्थित राहतील. या रात्रीच्या जेवणाचे उद्दिष्ट देशांच्या प्रमुखांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आणि विविध जागतिक मुद्यांवर चर्चा करणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पॅरिसला पोहोचतील. त्या संध्याकाळी एक खास जेवणाचे आयोजन केले आहे. हे रात्रीचे जेवण प्रसिद्ध एलिसी पॅलेसमध्ये होईल, जिथे तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) देखील उपस्थित राहतील, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिश्रा यांनी दिली.
तिसरी उच्चस्तरीय एआय शिखर परिषद
फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आलेली ही तिसरी उच्चस्तरीय एआय शिखर परिषद आहे. यापूर्वी, 2023 मध्ये ब्रिटनमध्ये आणि 2024 मध्ये दक्षिण कोरियामध्ये अशाच प्रकारच्या परिषदा आयोजित करण्यात आल्या होत्या. या शिखर परिषदेच्या माध्यमातून भारत आणि फ्रान्समधील तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत होईल.
राफेल एम कराराची घोषणा शक्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान संरक्षण क्षेत्र, स्मॉल मॉड्यूलर रिअॅक्टर्स (एसएमआर) आणि विमान देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (एमआरओ) संबंधित महत्त्वाच्या घोषणा केल्या जातील. यासोबतच, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) वर फ्रान्स-भारत रोडमॅप स्वीकारण्याची योजना आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीदरम्यान भारतीय नौदलासाठी 26 राफेल-एम लढाऊ विमानांच्या कराराची घोषणाही केली जाऊ शकते.
अमेरिका दौऱ्याकडे जगाचे लक्ष
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी अधिकृत अमेरिकेच्या दौऱ्यावर पोहोचतील, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले. यादरम्यान ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतील आणि अमेरिकन प्रशासनातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा असेल. अमेरिकेत नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर तीन आठवड्यांच्या आत पंतप्रधान मोदींचा हा दौरा भारत-अमेरिका भागीदारीचे महत्त्व प्रतिबिंबित करतो. पंतप्रधानांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असेल.
अमेरिका दौऱ्यात व्यापार-तंत्रज्ञान हस्तांतरणावर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वॉशिंग्टन भेटीदरम्यान भू-राजकीय संबंध मजबूत करणे, व्यापार संबंध मजबूत करणे, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि बेकायदेशीर स्थलांतर या मुद्यांवर चर्चा केली जाईल, असे यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमचे (यूएसआयएसपीएफ) अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मुकेश अघी यांनी सांगितले. या दौऱ्यात होणाऱ्या द्विपक्षीय चर्चांमधून दोन्ही अर्थव्यवस्थांच्या विकासात मदत होईल, असेही ते म्हणाले. भविष्यातील व्यापारी संबंधांसाठी दोन्ही देशांमधील समन्वय महत्त्वाचा असेल. आर्थिक अजेंडा आणि तंत्रज्ञान हस्तांतरण यावर लक्ष केंद्रित करणे देखील महत्त्वाचे असेल आणि बेकायदेशीर स्थलांतराच्या मुद्यावर देखील निश्चितपणे चर्चा केली जाणार आहे. या भेटीदरम्यान व्यापार हा एक मोठा मुद्दा असेल असेही त्यांनी सांगितले. तसेच व्यवसाय भागीदारीसंबंधीच्या चर्चेलाही मूर्त स्वरुप देण्यावर एकमत होणार असल्याचे सांगण्यात आले.









