तीर्थक्षेत्रावर जाऊन उपासना करावी अशी भक्त, साधक आणि मुमुक्षु यांची इच्छा असते; परंतु व्यवहारात जगताना कधी कधी ते शक्य होत नाही. जाणे शक्य झाले नाही तरी तिथला प्रसाद, तीर्थ जर मिळाले तर खूप आनंद होतो. कृपेचा अनुभव येतो. कारण तीर्थक्षेत्राच्या प्रसादात तेथील सकारात्मक ऊर्जा सामावलेली असते. दर्शन झाले नाही तरी प्रसादाचा लाभ मूल्यवान असतो. प्रसाद हा बहुआयामी आहे. नैवेद्य अर्थात पक्वान्न, फळफळावळं, सुंठवडा यांपासून सुकामेव्यापर्यंत प्रसादात विविधता असते. नैवेद्याच्या ताटामधला प्रसाद मिळणे भाग्याचे असते कारण त्यावर प्रत्यक्ष परमात्म्याची अमृतदृष्टी पडलेली असते. कलियुगामध्ये प्राण अन्नात सामावला आहे. अन्नाचा नैवेद्य दाखवल्यानंतर त्यातील प्राण परमेश्वर घेतो आणि प्रसन्नतेने आपल्या दृष्टीने त्यात नवे प्राण निर्माण करतो. जणू अमृत. संतांचे उच्छिष्ट सुद्धा प्रसाद असतो. संतांच्या बोटांमध्ये पंचमहाभूतांच्या शक्तीमधील चैतन्य सामावले असते. त्यांच्या हातामध्ये जिवाचे रूपांतर शिवात करण्याचे सामर्थ्य असते. म्हणून तर सत्पुरुषांच्या हातून प्रसाद मिळावा ही कामना असते. त्यात शक्तीबीज अंतर्भूत असते.
प. पू. मामा देशपांडे म्हणतात, आधी तीर्थ, मग प्रसाद. कारण जलामध्येही प्राण आहे. अन्नामध्ये प्राणासह मन तयार करण्याची शक्ती आहे. अन्नाचे व पाण्याचे तीन भाग पडतात. अन्नापासून विष्ठा, रक्त आणि मन; तर पाण्यापासून घाम व मूत्र, रक्ताचे वहन. पाणी, तीर्थ व प्रसाद किती प्रमाणात घ्यावे याचेही नियम आहेत. तांब्याभर तीर्थ पिऊ नये व वाडगाभर प्रसाद खाऊ नये.
प्रसाद हातावर पडला की तो तात्काळ सेवन करावा. त्यास विलंब लावू नये असे दत्तावतारी संत प. पू. नानामहाराज तराणेकर म्हणतात. प्रसाद मिळताक्षणी तो ग्रहण केला नाही तर त्याचा अनादर होतो. पंचमहाभूते प्रसाद घेण्यास उत्सुक असतात. खूपदा प्रसाद भूमीवर सांडतो. ती तिचा भाग घेते. प. पू. नानामहाराजांनी शिष्यांना केलेला उपदेश लक्षात ठेवावा असाच आहे. प्रसाद देवाला, संतांना अर्पण करताना तो स्वच्छ करावा. उदाहरणार्थ मनुका बाजारातून आणल्या आणि तशाच अर्पण केल्या तर त्याच्या काड्या संतांच्या घशात अडकतात. केळी नेहमी सोलून देवापुढे, संतांपुढे ठेवावीत. प्रसाद म्हणून केळ मिळाले तर भक्त सोलून खातात आणि साल फेकून देतात. सालीमध्येही प्रसाद नसतो का? चिकू, खारीक, जर्दाळू अर्पण करताना त्यातील बिया काढून अर्पण करावे. उकळते, गरम पदार्थ देवापुढे ठेवू नयेत. योग्य ते तापमान बघून देवाला द्यावेत. नंतर त्याचा प्रसाद होतो.
श्रीरामांचा जन्म हा अग्निनारायणाच्या प्रसादाने झाला. पुत्रकामेष्टी यज्ञ सफल झाला आणि अग्निनारायण प्रकट झाले. गदिमा लिहितात, ‘तुझ्या यज्ञी मी प्रकट जाहलो हा माझा सन्मान, दशरथा घे हे पायसदान’.. संत तुलसीदास विरचित रामचरितमानसमध्ये अग्निनारायणाने दिलेल्या प्रसादाचे वाटप वेगळ्याच तऱ्हेने झाले असे म्हटले आहे. संत तुलसीदास म्हणतात की, अयोध्यानरेश दशरथ महाराजांनी प्रसादाचा अर्धा हिस्सा कौसल्या राणीला दिला. कौसल्या राणीने परमेश्वराचे स्मरण करीत तो घेतला. बाकी प्रसादाचे दोन भाग केले. एक भाग कैकयीला दिला आणि उरलेल्या प्रसादाचे पुन्हा दोन भाग केले. एक भाग कौसल्येच्या हातात आणि दुसरा भाग कैकयीच्या हातात देऊन राजा दशरथ म्हणाले, हा प्रसाद तुम्ही दोघी सुमित्रेला द्या. असे दोन भाग करून दोन राण्यांच्या हस्ते सुमित्रा राणीला प्रसाद देण्याचे काय कारण असावे? कारण सुमित्रा आणि कैकयी यांचा दर्जा समान होता. सुमित्रा शांत आणि समजूतदार राणी आहे. कैकयी कोपिष्ट आहे. रघुवंशामध्ये धर्ममर्यादा आहे की डाव्या हाताने प्रसाद द्यायचा नाही आणि दोनदा प्रसाद घ्यायचा नाही. राजा दशरथांच्या मनात संघर्ष निर्माण झाला की प्रथम प्रसाद कुणाला द्यावा? सुमित्रेवर अन्याय व्हायला नको आणि कैकयीला क्रोध यायला नको. म्हणून त्यांनी युक्ती केली की प्रसादाचे दोन भाग करून कौसल्या व कैकयी या दोन राण्यांच्या हस्ते सुमित्रा राणीला दिले. प्रसाद हा सन्मान असतो. सुमित्रा राणी म्हणाली, कौसल्या आणि कैकयी माता तुम्हाला दोघींना प्रसाद देऊन अयोध्या सम्राटांनी सन्मानित केले आणि तुम्ही दोघींनी मला सन्मान दिला. परमात्म्याने मला दोन पुत्र द्यावेत. एक पुत्र कौसल्या मातेसाठी आणि दुसरा कैकयी मातेच्या सेवेसाठी मी अर्पण करीन. त्यानुसार सुमित्रा राणीने झालेले दोन पुत्र कौसल्यानंदन श्रीराम याला लक्ष्मण आणि कैकयीनंदन भरत याच्या सेवेसाठी शत्रुघ्नला दिले.
संतती ही प्रसादरूपी असते. म्हणून मुलाचे नाव गुरुप्रसाद, चैतन्यप्रसाद, माताप्रसाद असे ठेवायची पद्धत आहे. वस्त्रप्रसाद, पादुकाप्रसाद तर असतोच; शिवाय वाणीप्रसादही असतो. सरस्वती मातेच्या कृपाप्रसादाने वाणी प्रासादिक होते. संतांचा वाणीरूप आशीर्वाद हा प्रसाद असतो. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात- ‘अगा विश्वैकधामा । तुझा प्रसादू चंद्रमा। करू मज पूर्णिमा । स्फूर्तीची जी?’ -सर्व जगताला एकच आश्रय असणाऱ्या श्री गुरुराया तुझा प्रसादरूपी चंद्र माझ्या अंत:करणात उदयास येऊन स्फूर्तीरूप पौर्णिमा करू. माऊली म्हणतात-‘तरी आता येणे प्रसादे । विन्यासे विदग्धे । मूळ शास्त्रपदे। वाखाणीन’ आता श्री गुरूंच्या प्रसादाने मूळ जी गीताशास्त्रातील पदे आहेत ती विस्ताराने चातुर्यपूर्वक वर्णन करीन. असे वर्णन करीन की जिवाच्या आत असलेली संशयरूप होडी बुडून जाईल.
समर्थ रामदास स्वामींच्या चरित्रात एक कथा आहे. छत्रपती शिवाजीराजे समर्थांना भेटण्यासाठी शिवथरघळीत गेले. त्यावेळी शिवाजी महाराजांनी विडा खाणे सोडून दिले होते. समर्थांनी शिवाजी महाराजांना विडा देताच त्यांनी तो तात्काळ खाल्ला तेव्हा समर्थ म्हणाले, ‘आपण तांबूल सेवन वर्जिले ऐसे वर्तमान ऐकले होते.’ तेव्हा छत्रपती म्हणाले, ‘आम्ही तांबूल नाही भक्षिला. आम्ही प्रसाद सेविला.’ ही गुरूनिष्ठा हृदयात नित्य जतन करावी अशीच आहे. देवाच्या स्थानांमधील प्रसाद हा पवित्र असतो. म्हणूनच प्रसाद भक्षण करताना उपासतापास दूर ठेवलेलेच बरे, असे जाणकार सांगतात. ‘हरीचा काला गोड झाला, ज्याच्या नशिबी त्यास मिळाला’ या उक्तीनुसार प्रसाद परमभाग्याने मिळतो, हे निश्चित.
-स्नेहा शिनखेडे








