केरळच्या दौऱ्यावर काँग्रेसच्या नेत्या
वृत्तसंस्था/ मलप्पुरम
काँग्रेस खासदार प्रियांका वड्रा केरळच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी मलप्पुरममध्ये त्यांनी मानव-पशू संघर्षाचा मुद्दा उपस्थित केला. मी यासंबंधी यापूर्वी आवाज उठविला होता आणि हा मुद्दा उपस्थित करत राहणार आहे. आम्हाला येथे अधिक निधीची आवश्यकता आहे. माझ्या मागील दौऱ्यात मी जिल्हाधिकारी आणि वन अधिकाऱ्याची भेट घेतली होती. येथे केंद्र आणि राज्य सरकारकडून कमी प्रमाणात निधी दिला जात आहे. येथील सर्व समस्या दूर करण्याची विनंती करणार असल्याचे प्रियांका वड्रा यांनी म्हटले आहे.
मानव-पशू संघर्षाच्या मुद्द्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे मला वाटते. हा एक गुंतागुंतीचा मुद्दा असून यावर तोडगा सोपा नसेल, परंतु शक्य तितका दबाव टाकून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. निधी वाढविण्यासोबत प्रभावी देखरेख, सुरक्षा उपाययोजना, वनरक्षकांच्या उपलब्धतेवर जोर द्यावा लागेल. आम्ही यासंबंधी काम करू असे उद्गार प्रियांका यांनी काढले आहेत.
तर वायनाडच्या खासदार प्रियांका वड्रा यांनी यापूर्वी मननथावाडी विधानसभा मतदारसंघात बूथस्तरीय नेत्यांची बैठक घेतली होती. यादरम्यान त्यांनी जिल्ह्यातील भूस्खलन पीडितांना आजवर घरासंबंधी समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांना पुरेशी भरपाई मिळाली नसल्याचे म्हटले.
वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
केंद्र सरकारने आमच्या प्रयत्नांमुळे कमीतकमी वायनाड भूस्खलनाला गंभीर नैसर्गिक आपत्ती घोषित केले. यामुळे पीडितांच्या पुनर्वसनासाठी अधिक निधीप्राप्त होईल अशी अपेक्षा आहे. वायनाड जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे जीवितहानी होत असून उपजीविकेचेही नुकसान होत आहे. मागील वेळी जिल्हा प्रशासनाने मानव-पशू संघर्ष कमी करणे आणि लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अधिक निधीची गरज असल्याचे नमूद केले होते असा दावा प्रियांका वड्रा यांनी केला आहे. वाघाच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या महिलेच्या कुटुंबीयांची प्रियांका वड्रा यांनी 28 जानेवारी रोजी भेट घेतली होती.









