कराड :
सोशल मिडियावर टाकलेल्या पोस्टवर केलेल्या कमेंटवरून शुक्रवारी कराडात दोन गटात राडा झाला. पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले आहे. सोशल मिडियावर प्रोफाईल तयार करून त्यावर भाईगिरीच्या पोस्ट टाकणाऱ्यांना यापुढे पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पोलिसांनी सोशल मिडियावरील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर त्यादृष्टीने तपासणी सुरू करत संशयितांच्या प्रोफाईल तपासला जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी हाती घेतलेली मोहिम सोशल मिडियावरील भाईगिरीला आळा घालेल अशी प्रतिक्रिया आहे. कराड शहरात सोशल मिडियावर केलेल्या पोस्ट व कमेंटवरून शुक्रवारी राडा झाला. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या. जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर यांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले. कराड शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी भाईगिरीला आळा घालण्याचा चंग पोलिसांनी बांधला. त्यादृष्टीने पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी रेकॉ र्डवरील गुन्हेगारांसह सध्या तडीपार असुनही सोशल मिडियाच्या माध्यमातून शहरातील त्यांच्या साथीदारांच्या संपर्कात असणाऱ्यांची तपासणी करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्यादृष्टीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सपोनि अमित बाबर, गुन्हे प्रकटीकरणचे अशोक भापकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी सोशल मिडियावरील प्रत्येक प्लॅटफॉर्म तपासणीसाठी पथके नेमली आहेत. या पथकांच्या माध्यमातून भाईगिरीच्या पोस्ट टाकणारांना तसेच त्यावर कमेंट करून गुन्हेगारीला प्रवृत्त करणाऱ्यांची कुंडली काढण्याचे काम सुरू झाले आहे. शनिवारी सोशल मिडियावर भाईगिरीच्या गाण्यांसह स्वत:ची पोस्ट करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह त्यावर कमेंट करणारांना पोलीस ठाण्यात आणले जात होते. त्यांच्याकडे पोलीस कसून चौकशी करत कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यास आपण कारण ठरत आहात. या अनुषंगाने कारवाईच्या हालचाली करत होते.
शहरासह परिसरातील अनेक टोळ्यांच्या म्होरक्यांचे सोशल मिडिया अकाऊंट पोलिसांनी तपासून त्याचे पुरावे तयार केले आहेत. सोशल मिडियावरील टोळीयुद्ध हे पोलिसांच्या नजरेतून सुटलेले नाही. साहजिकच पुढे कोणताही अनर्थ होऊन कराड शहराच्या शांततेला बाधा येऊ नये म्हणून पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर स्वतः याकडे लक्ष देत आहेत. सोशल मिडियावरील वाद हा एखाद्या गंभीर घटनेत बदलू नये म्हणून पोलिसांनी उचलेले हे पाऊल अनेकांना अडचणीचे ठरल्याचे दिसते.
पालकांनीही सजग रहावे
गुन्हेगारांना फॉलो करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वेळीच त्यापासून स्वत:ला दूर ठेवावे. रेकॉर्डवरील गुन्हेगार हे शालेय मुलांसह काही महाविद्यालयीन युवकांचा वापर करून स्वतः नामानिराळे रहात असल्याची उदाहरणे आहेत. पालकांनीही आपला मुलगा कोणाच्या सानिध्यात आहे याची मैत्रीपुर्ण चौकशी करावी. संशयास्पद काही वाटल्यास पोलिसांशी संपर्क साधून मुलांना गुन्हेगारी आकर्षणापासून दूर करावे असे आवाहन पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी केले आहे.







