जिल्ह्यासह बेळगाव, कोल्हापूर, गोव्यातून होणार भाविकांची गर्दी !
ओटवणे प्रतिनिधी
कारिवडे गोसावीवाडी येथील सिद्धयोगी महापुरुष मठाचा भंडारा उत्सव मंगळवारी ११ फेब्रुवारीला होत आहे. कोकणात ठराविक ठिकाणी असलेल्या गोसावी नाथपंथी सिद्धमहापुरूष मठापैकी हा मठ असुन या भंडारा उत्सवासाठी जिल्ह्यासह बेळगाव, कोल्हापूर भागातून हजारो भाविक उपस्थित असतात.सिद्धयोगी महापुरुषाचा हा प्राचीन मठ असून येथे नाथपंथी समाजाची संस्कृती आणि परंपरा जोपासली जाते. त्यामुळे अध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात नवनाथांनी केलेल्या समाजजागृतीची आणि सांप्रदायिक भावनेची येथे प्रचिती येते. हा नाथपंथीय मठ डोंगराच्या निसर्गरम्य परिसरात असून हे एक जागृत देवस्थानही मानले जाते. तसेच राजसत्ता व पुरूमागाला जोडलेल्या या देवस्थानचा भंडारा उत्सव नाथपंथी परंपरेनुसार सुरू आहे.या उत्सवानिमित्त मठात मंगळवारी सायंकाळी ७ वाजल्यापासून नाथसंप्रदायाच्या विधीनुसार पूजा मांड घालून मंत्रतंत्र म्हणून घट स्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर सिद्ध महापुरुषाच्या दर्शनासह नवस बोलणे व फेडणे यासाठी भाविकांची रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होते. रात्री १०:३० च्या सुमारास ग्रामदैवत कालिका मंदिरातून देवीच्या उत्सव मूर्तीसह तरंग सवाद्य पालखी सिद्ध महापुरुषाच्या समाधीकडे रवाना होणार आहे. शेकडो भाविकांच्या या सवाद्य पालखी मिरवणुकीचे सिद्ध महापुरुष मंदिराकडे आगमन झाल्यानंतर प्रथम महिला औक्षण करतात. त्यानंतर सिद्ध महापुरुष आणि कालिका मातेच्या अविस्मरणीय भेटीचा याची देही याची डोळा क्षण पाहून हजारो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. मध्यरात्री १२ वाजता भंडारा उत्सव झाल्यानंतर रखवालीसाठी गा-हाणे घालण्यात येते. त्यानंतर सालाबादप्रमाणे ओटवणे येथील दशावतारी कलाकारांचे नाटक होणार आहे. त्यानंतर या भंडारा उत्सवातील महत्वपूर्ण प्रसाद अर्थात सांदणीचे कारिवडे तसेच ओटवणे देवस्थानच्या मानकऱ्यांसह सावंतवाडी येथील सावंत भोसले राजघराण्याला देण्यात येतो. बुधवारी सायंकाळी या मठातील कालिकादेवीच्या उत्सवमूर्तीसह तरंग व पालखीचे कालिका मंदिरात प्रस्तान झाल्यानंतर या भंडारा उत्सवाची सांगता नाथसंप्रदयातील विविध परंपरांचे पालन करून होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.









