कोल्हापूर :
बारावीच्या लेखी परीक्षेला 11 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. विद्यार्थ्यांनीही अभ्यासाची जोरदार तयारी केली आहे. अशातच विमला गोयंका हायस्कूल इंग्लिश मिडियम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्या 120 विद्यार्थ्यांचे हॉलतिकीटच चुकीचे असल्याचे निदर्शनास आले. ऐवढेच नाही तर काही विद्यार्थ्यांना हॉलतिकिटच मिळालेले नाही, तर एकाच विद्यार्थीनीचा दोन ते तीन हॉलतिकीटवर फोटो छापून आला आहे. तसेच वर्षभर शिकलेल्या दोन ते तीन विषयांऐवजी दुसरेच विषय हॉलतिकीटमध्ये आहेत. असा अनागोंदी कारभार शनिवारी शाळेने हॉलतिकीट वाटप केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. विद्यार्थ्यांनी पालकांना शाळेत बोलावून घेतल्यानंतर पालकांनी संस्थेचे सचिव, मुख्याध्यापक व शिक्षकांना चांगलेच धारेवर धरले. या गोंधळाची माहिती कळताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी हॉलतिकिट देवून विद्यार्थ्यांचे नुकसान होवू देणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थी व पालकांनी सुटकेचा श्वास सोडला.
विमला गोयंकामध्ये बारावीच्या वर्गात 120 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गतवर्षी अकरावीला प्रवेश घेतल्यापासून विद्यार्थ्यांना 100 गुणांचे इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित हे चार तर 200 गुणांचा कॉम्प्युटर सायन्स विषय शिकवला जात आहे. यंदा बारावीतही वर्षभर याच पाच विषयांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. परंतू परीक्षेच्या हॉलतिकीटवर मात्र वेगळेच विषय, तसेच स्वत:चा फोटो आहे पण नाव दुसऱ्याचे, एकाच विद्यार्थ्याचा दोन ते तीन रिसिटवर फोटा अन सही, तर वर्षभर कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेवूनसुध्दा त्यांच्या हॉलतिकीटवर दुसरेच मराठी आणि भुगोल विषय आले आहेत. या विषयांचा वर्षभर अभ्यास केलाच नाही तर पेपर लिहायचा कसा? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. विमला गोयंकाने परीक्षेच्या हॉलतिकीटवर घाललेला गोंधळ पाहून विद्यार्थ्यांनी रडायला सुरू केले आणि पालकांना फोन करून शाळेत बोलावून घेतले. परीक्षेच्या तीन दिवस आधी हा प्रकार उघडकीस आल्याने विद्यार्थी आणि पालकांना काय करायचे सुचेना. हॉलतिकीट असल्याशिवाय परीक्षा कशी देणार या विचाराने विद्यार्थ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. विद्यार्थी व पालकांमुळे शाळेला छावणीचे स्वरूप आल्याने राजवाडा पोलिस स्थानकातील पोलिसांनी शाळेत धाव घेतली. अनेक पालकांनी मुख्याध्यापकांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे.

- विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही
विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटातील चुकांसंदर्भात माजी नगरसेवक सचिन चव्हाण व भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांना दूरध्वनीवरून संपर्क करून विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत बिनचूक हॉलतिकीट देण्याची विनंती केली. यावर गोसावी यांनी ऑफलाईन अर्ज भरून शाळेमार्फत कोल्हापूर विभागीय मंडळाकडे सादर करण्याच्या सुचना दिल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुसान होवू नेणार नाही, विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा होतील.
शरद गोसावी (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ) यांना
- काही विद्यार्थ्यांचे अर्जच भरले नाहीत
विमला गोयंकाने सर्व प्रकारचे शुल्क घेतले आहे, परंतू विद्यार्थ्यांचे अर्जच भरले नाहीत. त्यामुळे डुप्लीकेट सही करून विद्यार्थ्यांना चुकीचे हॉलतिकीट दिल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शिवाजी पेठेतील नेत्यांनी विद्यार्थ्यांचे ऑफलाईन अर्ज भरण्याच्या सुचना देवून पालक व विद्यार्थ्यांना शांत केले. विद्यार्थ्यांना ऑफलाईन अर्ज, फोटो व आधार कार्डची प्रिंट काढून देण्याची व्यवस्था केली. विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज भरून शाळेकडे सादर केले आहेत. सर्व विद्यार्थ्यांची लेट फी भरून अर्ज कोल्हापूर विभागीय मंडळाला पाठवून हॉलतिकीट मिळवून देण्याची जबाबदारी शाळेची आहे.
- पालकांनी आणि विद्यार्थ्यांना काळजी करू नये
विमला गोयंकाने विद्यार्थ्यांना चुकीचे हॉलतिकीट दिल्याचा गोंधळ समजल्यानंतर कोल्हापूर विभागीय मंडळांच्या अध्यक्षांची भेट घेवून 120 विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवून परीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी काळजी करू नये.
प्रा. जयंत आसगावकर (शिक्षक आमदार)
- विद्यार्थ्यांचे कोणतीही अडचण येणार नाही
विमला गोएंका इंग्लिश मेडियम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसंदर्भात घडलेल्या प्रकारानुसार संस्थेच्या वतीने वरीष्ठ पातळीवरून दखल घेवून विद्यार्थी हित लक्षात घेवून कोणतेही नुकसान होणार नाही याची दखल घेतली आहे. कोल्हापूर विभागीय मंडळाने सर्वोत्परी सहकार्य केलेले आहे. त्यांच्या सर्व नियमावलीचे पालन करण्यात येत आहे. सर्व विद्यार्थी येत्या परीक्षेस सहभागी होतील कोणतीही अडचण येणार नाही.
प्रभाकर हेरवाडे (सचिव, दि न्यू एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर)








