देशाच्या राजधानीत भ्रष्टाचाराला थारा नाही : मुख्यमंत्री
प्रतिनिधी/ साखळी
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा पराभव करीत भाजपने पूर्ण बहुमत मिळवत प्राप्त केलेल्या विजयोत्सवाचा जल्लोष सांखळीत भाजपकडून करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना तर दामू नाईक यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना पेढा भरवत हा विजयोत्सव साजरा केला. या विजयोत्सवात आमदार दाजी साळकर, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर, महिला नेत्या सुलक्षणा सावंत, इतर नेते व सांखळीतील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी घोषणा देऊन विजयोत्सवाचा जल्लोष करण्यात आला.
दिल्लीत 27 वर्षांनंतर भाजपचे सरकार स्थापन होत आहे ही मोठी बाब आहे. देशात भाजपचे सरकार असताना राजधानी दिल्लीत भाजपचे सरकार येणे महत्त्वाचे होते. नेमका हाच विचार लक्षात घेऊन दिल्लीवासियांनी दिल्लीतील आपला दूर केले. भ्रष्टाचाराला दिल्लीत थारा नाही हा संदेश देताना डबल इंजिन सरकारला काम करण्याची संधी दिली आहे. मतदारांनी केजरीवाल यांच्या अहंकाराला जबरदस्त धक्का दिला आहे, असे म्हणत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जे. पी. न•ा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले.
अहंकारी वृत्तीचा पराभव : दामू नाईक
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी वेळोवेळी आपल्या अहंकाराचे दर्शन घडविताना भाजपला अनेक आव्हाने दिली होती. आपणास पराभूत करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना दुसरा जन्म घ्यावा लागणार, या आव्हानातील अहंकाराला दिल्लीवासियांनी जबरदस्त चपराक दिली आहे. दिल्लीत माजविलेल्या अहंकारी वृत्तीचा हा पराभव आहे. गोव्यातही त्यांनी रोपटे लावले होते. तेही आता अंत होण्याच्या मार्गावर आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी म्हणाले. यावेळी सांखळी भाजप मंडळ अध्यक्ष रामा नाईक तसेच सांखळी मतदारसंघातील विविध पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पंचायत सदस्य, नगरसेवक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









