अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढतींची शक्यता, निवडणूक शांततेत पार पाडण्याचे प्रयत्न
प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील शेकडो देवस्थान समित्यांच्या आज दि. 9 रोजी होणाऱ्या निवडणुका विनाव्यत्यय आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडाव्यात तसेच यादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी उत्तर आणि दक्षिण जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. त्यादृष्टीने उपजिल्हाधिकारी, मामलेदार, देवस्थान प्रशासक यांना निर्देश जारी करण्यात आले आहेत.
तरीही निवडणूक प्रक्रियेदरम्यान अटीतटीची लढत आणि गटातटांचे राजकारण यातून काही ठिकाणी वाद निर्माण होऊन प्रकरण तंग बनण्याची, हातघाईवर येण्याची, अनुचित प्रकार घडण्याचीही शक्यता गृहित धरून सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांना दक्षतेचे आणि सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. कोणतीही माहिती मिळाल्यास तत्काळ संबंधित पोलिस आणि कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना कळवावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.
विद्यमान पदाधिकाऱ्यांचा आटापिटा, नवोच्छुकांचे सत्तेसाठी जीवाचे रान
बहुतांश ठिकाणी विद्यमान समित्यांचे पदाधिकारी पुन्हा सत्तास्थानी येण्यासाठी आटापिटा करत आहेत तर त्यांना पाडून ही देवस्थाने ताब्यात घेण्यासाठी नवोच्छुकांचे गट जीवाचे रान करत आहेत. त्यातून गट, पॅनेल तयार झाले असल्याचे दिसून आले आहे.
या पार्श्वभूमीवर या निवडणुकांसाठी नियुक्त निरीक्षकांनी स्वत:च्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पाडावी. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत देवस्थान प्रशासकांसह सर्व अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या ठिकाणी उपस्थित रहावे, तसेच त्यावेळी कोणतीही अनियमितता होणार नाही याची खबरदारी घ्यावी व निवडणूक मुक्त आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेशात पुढे म्हटले आहे.
ही निवडणूक रविवारी अर्थात साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी होत असली तरी या प्रक्रियेत सहभागी कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी यांना सुट्टी मिळणार नाही. त्यांनी रविवारसह सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ड्युटीवर हजर राहून अहवाल सादर करावे लागणार आहे, असे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर लगेचच निकालही जाहीर करण्यात येणार आहे.









