हिंडलगा हुतात्मा स्मारक येथे आयोजन
बेळगाव :
तालुका म. ए. समिती युवा आघाडीतर्फे रविवार दि. 9 रोजी दुपारी 4 वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या आवारात चंदगड-आजरा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शाल, श्रीफळ आणि शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. आमदार शिवाजी पाटील यांनी निवडणुकीदरम्यान आपल्या जाहीरनाम्यात सीमाप्रश्नाचा उल्लेख केला होता. शिवाय निवडून आल्यानंतर विधानसभेत सीमाप्रश्नाचा उल्लेख करत शपथ घेतली होती. शिवाय सीमाप्रश्नाबाबत कायम तळमळ दाखविली आहे. याची दखल घेऊन त्यांचा सत्कार केला जाणार आहे. यावेळी म. ए. समितीचे नेते त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. शिवाय सीमाभागातील मराठी भाषिकांच्या व्यथा विधानसभेत मांडाव्यात, अशी मागणीही केली जाणार आहे. म. ए. समितीच्या सर्व शहर आणि ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणेकर यांनी केले आहे.









