27 वर्षांनंतर भाजपचा झेंडा : आपच्या ‘झाडू’ला झटकले : काँग्रेसचा सुपडा साफ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे तब्बल 27 वर्षांनी ‘कमळ’ फुलले आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार एकंदर 70 जागांपैकी भाजपने 48 जागा जिंकल्या आहेत. तर आम आदमी पक्षाला केवळ 22 जागा मिळाल्याने ‘आप’च्या हातची सत्ता निसटली आहे. दुसरीकडे, काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. ट्रेंड समोर आल्यानंतर भाजप समर्थकांनी ढोल-ताशांच्या तालावर नाच करण्यास आणि पक्षाचे झेंडे फडकावून जल्लोष करायला सुरुवात केली. भाजपचे निवडणूक चिन्ह कमळाचे कट-आउट हातात घेतलेल्या समर्थकांनी एकमेकांना भगवा रंगही लावला. तर आप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पूर्णपणे सन्नाटा दिसून येत होता.
दिल्लीत बराच काळ सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाचा (आप) भाजपने दारुण पराभव केला आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून ‘आप’ने केवळ तीनवेळा सत्ता सांभाळणारे सरकार गमावले नाही तर अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांसारखे दिग्गज नेते आपल्या जागा वाचवू शकले नाहीत. नवी दिल्ली मतदारसंघात भाजपचे प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांचा पराभव केला. आता प्रवेश वर्मा दिल्लीचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात.

आपचे अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून आणि मनिष सिसोदिया जंगपुरा येथून निवडणूक हरले. मुख्यमंत्री आतिशी यांनी कालकाजी मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. सत्येंद्र जैन यांचाही निवडणुकीत पराभव झाला आहे. पराभवानंतर केजरीवाल यांनी ‘आम्हाला पराभव मान्य आहे. भाजपच्या विजयाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.’ अशी एका ओळीची प्रतिक्रिया देत सावध भूमिका घेतली आहे. तर भाजप नेत्यांनी ‘आपदा’ कोसळली अशा आशयाची वक्तव्ये करत विजयाचा जल्लोष सुरू केला आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला लक्षणीय आघाडी मिळाल्याचे दिसून आल्यानंतर, पक्षाच्या दिल्ली युनिटचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी दिल्लीत भाजप सरकार स्थापन करेल असा विश्वास व्यक्त केला. दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचा असेल आणि केंद्रीय नेतृत्व यासंदर्भात निर्णय घेईल. आतापर्यंतचे निकाल आमच्या अपेक्षेनुसार आहेत, परंतु आम्ही अंतिम निकालाची वाट पाहू, असे त्यांनी कॅनॉट प्लेसमधील हनुमान मंदिरात प्रार्थना केल्यानंतर सांगितले.
सचिवालय सील करण्याचे आदेश
निवडणूक निकालाअंती भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर दिल्ली सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने सचिवालय सील करण्याचे आदेश जारी केले. त्यानुसार कोणतीही फाईल, कागदपत्रे किंवा संगणक हार्डवेअर सचिवालयाच्या आवारातून परवानगीशिवाय बाहेर नेऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.
दिग्गजांच्या पराभवाने ‘आप’ला मोठा धक्का
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपच्या प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांचा पराभव केला आहे. त्याच वेळी, जंगपुरा मतदारसंघात मनीष सिसोदिया यांचा भाजप उमेदवार तरविंदर सिंग मारवाह यांनी पराभव केला.
काँग्रेसला ‘भोपळा’ पण, मतांमध्ये 2 टक्क्यांनी वाढ
गेल्या निवडणुकीच्या (2020) तुलनेत भाजपने आपल्या जागा 40 ने वाढवल्या. त्याचवेळी, ‘आप’ने 40 जागा गमावल्या आहेत. मागील निवडणुकीप्रमाणे यावेळीही काँग्रेसला खाते खोलता आले नसल्याने हाती ‘भोपळा’च राहिला. मात्र, काँग्रेसला एकही जागा मिळाली नसली तरी, त्यांना त्यांच्या मतांचा वाटा 2 टक्क्यांनी वाढविण्यात यश आले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपने आपल्या मतांच्या टक्केवारीत 9 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ केली. त्याचवेळी ‘आप’ला 10 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागले आहे.
चर्चेतील चेहरे आणि निवडक मतदारसंघातील निकाल
मतदारसंघ उमेदवार व पक्ष निकाल
नवी दिल्ली अरविंद केजरीवाल, आप 4,089 मतांनी पराभूत
जंगपुरा मनीष सिसोदिया, आप 675 मतांनी पराभूत
कालकाजी आतिशी मार्लेना, आप 3521 मतांनी विजयी
नवी दिल्ली प्रवेश वर्मा, भाजप 4,089 मतांनी विजयी
नवी दिल्ली संदीप दीक्षित, काँग्रेस 25,520 मतांनी पराभव
रोहिणी विजेंदर गुप्ता, भाजप 37,816 मतांनी विजयी
शकूर बस्ती सत्येंद्र कुमार जैन, आप 20,998 मतांनी पराभव
बिजवासन कैलाश गेहलोत, भाजप 11,276 मतांनी विजयी
मालवीय नगर सोमनाथ भारती, आप 2,131 मतांनी पराभूत
मालवीय नगर सतीश उपाध्याय, भाजप 2,131 मतांनी विजयी
ग्रेटर कैलाश सौरभ भारद्वाज, आप 3,188 मतांनी पराभूत
कालकाजी रमेश बिधुरी, भाजप 3521 मतांनी पराभव
कालकाजी अलका लांबा, काँग्रेस 47,762 मतांनी पराभव
ओखला अमानतुल्ला खान, आप 23,639 मतांनी विजयी
पटपडगंज अवध ओझा, आप 28,072 मतांनी पराभूत
गांधीनगर अरविंद सिंग लवली, भाजप 12,748 मतांनी विजयी
बाबरपूर गोपाल राय, आप 18,994 मतांनी विजयी
करावल नगर कपिल मिश्रा, भाजप 23,355 मतांनी विजय
मटिया महल शोएब इक्बाल, आप 42,724 मतांनी विजयी
वजीरपूर रागिणी नायक, काँग्रेस 48,373 मतांनी पराभूत
पटेल नगर कृष्णा तीरथ, काँग्रेस 52,858 मतांनी पराभव
माडीपूर (एससी) राखी बिर्ला, आप 10,899 मतांनी पराभूत
राजौरी गार्डन मनजिंदर सिंग सिरसा, भाजप 18,190 मतांनी विजयी









