वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना कटकमध्ये रविवारी खेळविला जाणार आहे. भारतीय संघाचे भुवनेश्वरमध्ये आगमन झाले. शनिवारी भारतीय संघातील 3 खेळाडूंनी प्रसिद्ध असलेल्या पुरीच्या जगन्नाथ मंदिराला भेट देवून या मंदिरातील भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि बालभद्र यांचे दर्शन घेतले.
भारतीय संघातील वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी शनिवारी सकाळी लवकरच जगन्नाथ पुरी मंदिराला भेट दिली. या भेटीवेळी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. भुवनेश्वर आणि कटक दरम्यान पोलीस आयुक्त देवदत्त सिंग यांनी चोख व्यवस्था ठेवली होती. या दर्शनानंतर हे खेळाडू कटकच्या बाराबत्ती स्टेडीयमकडे सरावासाठी रवाना झाले.









