गांजाविरोधी विशेष मोहिम सुरू
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची माहिती
कोल्हापूर
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गांजा आणि नशेली पदार्थाची विक्री करण्याविरोधी कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या पहिल्या तीन दिवसामध्ये जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात ४६ गुन्हे दाखल झाले आहे. गुन्हे दाखल झालेल्यामध्ये गांजा व नशेली पदार्थ पुरविणाऱ्या ४ जणासह ५५ जणाविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात गांजा आणि अंमली पदार्थाचे सेवन करण्याचे तरुणामध्ये प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे तरुणांच्या जीवनावर विपरित परिणाम होवू लागल्याने, याची गांभीर्याने दखल घेवून, तरुणांना गांजा आणि अन्य नशेली पदार्थाच्या व्यसनापासून दूर करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना नशेली पदार्थाच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी जिह्यामध्ये जे कोणी गांजा व नशेली पदार्थ विक्री करीत आहेत. त्याच्या विरोधी कारवाई करण्याविषयी सक्त आदेश दिला आहे. कारवाई करण्यासाठी ४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे.
तसेच आपल्या परिसरामध्ये गांजा अथवा गांज्या सारखा नशेली पदार्थाची कोणी नशा करीत असेल किंवा त्याची विक्री अथवा साठा करणाऱ्याची माहिती असेल. त्यांनी याबाबत संबंधीत पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकारी किंवा पोलीस नियंत्रण कक्षाच्या ०२३१-२६६२३३३ या नंबरवर संपर्क साधून माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिह्यातील नागरिकांना केलेले आहे.
दिनांक दाखल गुन्हे आरोपींची संख्या पुरवठा करणा-याची संख्या
4 / 2 / 2025 06 07 01
5 / 2 / 2025 17 22 02
6 / 2 / 2025 23 26 01
एकूण 46 55 04
गांजा सेवन व विक्री करणाऱ्यांना रस्त्यावरुन फिरविले
शहरातील राजारामपुरी पोलिसांना शुभम पिंटू शेलार (रा. शिवाजी पार्क, कोल्हापूर) हा गांजा सेवन करताना मिळून आला. त्याला ताब्यात घेवून, गांजा पुरविणाऱ्या किरण मनोहर अवघडे (रा. मातंग वसाहत, राजारामूपरी, कोल्हापूर) याला अटक केली. त्याच्या घरावर छापा टाकून 55 हजार 200 रुपये किंमतीचा 2 किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. या कारवाईनंतर गांजा सेवन करणारा शुभम शेलार आणि गांजाचा पुरवठा करणारा किरण अवघडे या दोघांना राजारामूपरी पोलिसांनी शुक्रवारी दुपारी राजारामपूरी परिसरातून पोलिसी खाक्या दाखवित तपासाच्या नावाखाली फिरविले.








