पतीचा उपचारादरम्यान मृत्यू : पत्नी गंभीर
खानापूर : रामनगर – अनमोड महामार्गावर अक्राळी क्रॉसनजीक थांबलेल्या ट्रकला मागून दुचाकीस्वाराने धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालक अँथोनी डिलिमा (वय 35, रा. तिनईघाट ता. जोयडा) हा ठार झाला आहे. तर त्याची पत्नी जस्टीन डिलिमा (वय 32) ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर बेळगाव केएलई इस्पितळात उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद खानापूर पोलिसात झाली आहे. ट्रकचालकावर गुन्हा नोंद केला असून खानापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी, तिनईघाट येथील रहिवासी अँथोनी डिलिमा यांचा रामनगर येथे बेकरी व्यवसाय आहे. नेहमीप्रमाणे ते गुरुवारी रात्री आपली बेकरी बंद करून रात्री 8 वा. तिनईघाट येथे घराकडे दुचाकीवरून निघाले होते.
यावेळी अक्राळी क्रॉस येथे रस्त्यावर के. ए. 22-डी-9743 मालवाहू ट्रक थांबविला होता. दुचाकीवरून जाणारे अँथोनी डिलिमा यांना थांबलेला ट्रक दृष्टीस न पडल्याने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच त्यांची पत्नी जस्टीन यांनाही डोक्याला व डाव्या पायाला दुखापत झाल्याने दोघांनाही उपचारासाठी रामनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. दोघांनाही अधिक उपचारासाठी बेळगाव केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान अँथोनी डिलिमा यांचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी तिनईघाट स्मशानभूमीत अँथोनी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे.
रामनगर परिसरात हळहळ
अँथोनी हे परदेशात नोकरीसाठी होते. अलीकडेच त्यांनी परदेशातील नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय करण्याच्या हेतूने रामनगर येथे बेकरी व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या या अपघाती निधनाने तिनईघाट-रामनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.









