लवकरच कामाला सुरुवात-खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी
खानापूर : खानापूर येथील रेल्वेस्थानकावर नव्याने प्लॅटफॉर्म आणि निवारा शेड तसेच महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रतीक्षालय उभारणीसाठी 3 कोटी 9 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने रेल्वे मंत्र्यांनी खानापूरसाठी निधी मंजूर केला असल्याचे ते म्हणाले.
खानापूर रेल्वेस्थानकाचा कायापालट केला असून नव्याने रेल्वेस्थानक उभारले आहे. मात्र प्लॅटफॉर्म आणि प्रतीक्षालय तसेच प्रवाशांसाठी स्वच्छतागृहाची सोय नव्हती याची दखल घेऊन खासदार विश्वेश्वर हेगडे यांनी याबाबत रेल्वे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे आराखड्यासहीत पाठपुरावा केला होता. याची दखल घेऊन केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी प्लॅटफॉर्म तसेच प्रतीक्षालय आणि स्वच्छता गृहासाठी 3 कोटीचा निधी मंजूर केला आहे. या कामाची सुरवात तातडीने करण्यात येणार असून लवकरात लवकर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार हेगडे यांनी सांगितले.
साडेचारशे मीटर लांब निवारा शेड उभारणार
प्लॅटफॉर्मवर साडेचारशे मीटर लांब निवारा शेड उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याशिवाय महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रतीक्षालय उभारण्यात येणार आहे. नैऋत्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांनी याबाबतचा मंजुरी आदेश जारी केला आहे.









