वृत्तसंस्था/ दुबई
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शुक्रवारी प्रसिद्ध गायक आतिफ अस्लमच्या आवाजातील चॅम्पियन्स ट्रॉफी, 2025 चे अधिकृत गाणे ‘जीतो बाजी खेल के’ हे प्रदर्शित केले. चॅम्पियन्स ट्रॉफीला 12 दिवस शिल्लक असताना हे गाणे प्रदर्शित केल्याने 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या 15 सामन्यांच्या या स्पर्धेविषयीची उत्सुकता आणखी वाढेल.
हे अधिकृत गीत अब्दुल्ला सिद्दीकी यांनी तयार केले आहे, ज्याचे बोल अदनान धूल आणि असफंदयार असद यांनी लिहिले आहेत. हा म्युझिक व्हिडिओ रस्त्यांपासून बाजारपेठा आणि स्टेडियमपर्यंत पाकिस्तानच्या संस्कृतीचे दर्शन घडवितो आणि क्रिकेटविषयीचे प्रेम तसेच त्यातून मिळणारा आनंद दाखवून देतो. हे अधिकृत गीत जगभरातील लोकप्रिय स्ट्रीमिंग ऑडिओ प्लॅटफॉर्मवर चाहत्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
दोन आठवड्यांच्या या रोमांचक स्पर्धेत जगातील अव्वल आठ संघ सहभागी होणार असून 19 दिवसांत 15 सामने होणार आहेत. आयसीसीने नमूद केल्याप्रमाणे मुख्य गायक आतिफ अस्लमने म्हटले आहे की, मला क्रिकेटची खूप आवड आहे आणि मला वेगवान गोलंदाज व्हायचे होते. खेळाची आवड आणि समज असल्याने मी प्रेक्षकांच्या उत्साहाशी, त्यांच्या जयजयकाराशी आणि चाहत्यांच्या भावनांशी जोडलेलो आहे. मी सामन्यांची, विशेषत: भारत-पाकिस्तान सामन्यांची वाट पाहत असे. म्हणूनच मी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, 2025 च्या अधिकृत गाण्याचा भाग बनल्याने खूप उत्साहित झालेलो आहे, असे त्याने सांगितले.
या गाण्याच्या लाँचिंगबद्दल आयसीसीचे मुख्य व्यावसायिक अधिकारी अनुराग दहिया म्हणाले की, चॅम्पियन्स ट्रॉफीविषयीची उत्सुकता वाढत आहे आणि आम्हाला अधिकृत गीत सादर करताना आनंद होत आहे. आम्ही चाहत्यांना सामन्याची तिकिटे आताच मिळवावीत आणि सामने अनुभवण्याची संधी चुकवू नये यासाठी प्रोत्साहित करत आहोत.









