कराड :
अवैध दारू विक्रीच्या गुन्ह्यात मदत करण्याचे आश्वासन देत खासगी इसमाद्वारे 3 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. कराड येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली. भीमराव माळी (वय 37 रा. मलकापूर ता. कराड), मुस्तफा मोहिदिन मणियार (वय 25 रा. लक्ष्मीनगर, मलकापूर ता. कराड) अशी दोघांची नावे असल्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार खाडे यांनी सांगितले.
लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अवैध दारू विक्री करणाऱ्या एकावर उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात मदत करून पुन्हा अवैध दारू विक्री सुरू करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या संशयित कर्मचाऱ्याने 5 हजारांची लाच मागितली होती. यातील पहिला हप्ता तीन हजार हा गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीने खासगी इसम मुस्तफा मणियार याच्याकडे देत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या किशोरकुमार खाडे, ऋषीकेश बडणीकर, प्रितम चौगुले, सुदर्शन पाटील, विठ्ठल रजपूत यांनी संशयिताला रंगेहात पकडले. याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचे भीमराव माळी, मुस्तफा मणियार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








